
उरण ( वार्ताहर ): श्री महागणपती देवस्थान आणि १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या बलिदानानी पावन झालेल्या भूमीत जन्मलेल्या अक्षय मुंबईकर यांची भारत सरकार राजपत्रित अधिकारी म्हणून असिस्टंट कमांडंट ( CRPF ) म्हणून निवड झाल्याने संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून चिरनेर परिसरातील ग्रामस्थांनी अक्षय मुंबईकर यांचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गावात मिरवणूक काढून जंगी स्वागत केले आहे.

१९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहात सहभाग घेणाऱ्या कुष्णा मुंबईकर यांच्या कुटुंबात जन्मलेल्या अक्षय पांडुरंग मुंबईकर या विद्यार्थ्यांनी युपीएस २०१९ बँचच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्याने त्यांची असिस्टंट कमांडंट ( CRPF ) या पदावर निवड झाली.केंद्रिय सुरक्षा बल नवी दिल्ली ( गुडगाव हरियाणा )येथे एक वर्षाचे अत्यंत कठिण लष्करी प्रशिक्षण घेऊन देशातील १९ राज्यातील ७८ लष्करी राजपत्रित अधिकारी च्या असिस्टंट कमांडंट ( CRPF ) मध्ये अक्षय मुंबईकर यांची निवड करण्यात आली.दि २९ मार्च २०२३ रोजी अक्षय मुंबईकर देशाच्या सेवेत रूजू झाला आहे. रविवार दि ९ एप्रिल रोजी आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून अक्षय मुंबईकर यांनी आपल्या कुटुंबासमवेत श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी चिरनेर या जन्मभूमीत हजेरी लावली होती.यावेळी मुंबईकर कुटुंबियांनी तसेच चिरनेर गावातील ग्रामस्थांनी अक्षय पांडुरंग मुंबईकर यांचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गावात मिरवणूक काढून त्यांचे जंगी स्वागत केले.देशसेवेसाठी असिस्टंट कमांडंट या पदावर निवड झाल्याने अक्षय मुंबईकर यानी आपल्या कुटुंबासह श्री महागणपती चे दर्शन घेऊन हुतात्म्यांना अभिवादन केले.
