जळगाव ( प्रतिनिधी )
हेलिकॉप्टर उड्डण प्रशिक्षण घेण्यासाठी आता परराज्यात किंवा परदेशात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मी पासून जळगाव विमानतळावर हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. जेट सर्व्ह एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून हे केंद्र सुरु करण्यात येत असून, प्रवेश प्रक्रिया मात्र दिल्ली येथून होणार आहे.
जग सध्या झपाट्याने प्रगतीपथावर धावत आहे. यामध्ये विमान सेवा अहत्वाची सेवा ठरत आहे. यामुळे देश आणि विदेशातील वैमानिकांची गरज ओळखून, देशातल्या महत्वाच्या विमानतळांवर उड्डण प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजीव कुमार यांनी जळगाव विमानतळावर नाईट लँडिंगसह सर्व सुविधा असल्याने, जळगाव विमानतळावर हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र सुरु होणार असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्रामध्ये खाजगी वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहेत, मात्र हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र नसल्याने एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे राज्यातील तरुण, तरुणींना याचा फायदा होणार आहे. हरियाणा, गुरुग्राम येथील “जेट सर्व्ह एव्हिएशन” कंपनीच्या माध्यमातुन हे केंद्र चालवण्यात येणार आहे. १ मे ला हे केंद्र सुरु करण्याची संपूर्ण तयारी झाली आहे.