नेरळ ( प्रतिनिधी )

नेरळ परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चिन्ह आहे. नुकतेच खांडा येथे सोनसाखळी चोरांनी एका महिलेला लक्ष केल्याची घटना ताजी असताना आता बाजारपेठेत किराणा दुकानासह ज्वेलर्सचे दुकान चोरांकडून लक्ष केले असल्याचे चित्र आहे. दरम्यान चोरी करत असताना चोर सीसीटीव्हीत कैद झाला असल्याने या चोराच्या मुसक्या नेरळ पोलिस कधी आवळणार याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नेरळ बाजारपेठेतील सनी इंटरप्राईजेस या महेश कटारिया यांच्या किराणा दुकानात ९ एप्रिलच्या रात्री एका चोरट्याने प्रवेश केला. मध्यरात्री २ च्या सुमारास अर्धनग्न अवस्थेत असलेल्या या चोरट्याने दुकानात शिरताच आपला मोर्चा गल्ल्याकडे वळवत त्यातील सुमारे ५ हजार रुपयांची रोकड, यासह दुकानातील ७ किलो बदाम, आणि तत्सम साहित्य घेऊन पोबारा केला. तर ही सबंध घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कटारिया यांनी दुकान उघडल्यावर हा प्रकार त्यांचा लक्षात आला. यासह त्यांनी तात्काळ नेरळ पोलिसांना या गोष्टीची कल्पना चोरीबाबत फिर्याद दाखल केली. तर दिनांक १० एप्रिल रोजी बाजारपेठेतील नाकोडा ज्वेलर्स या दुकानात काही ग्राहक आल्यावर त्यांना सोने दाखवत असताना त्याच वेळी त्यांच्या बाजूच्या किराणा दुकानात देखील ग्राहक आल्याने त्यांना सामान द्यायला जाताच सोन्याच्या दुकानातील ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी मालक समोर नसल्याचे पाहत सुमारे १० तोळे सोन्याची चैन घेऊन पोबारा केला. भर दुपारी झालेल्या या चोरीने व्यापारी वर्गात देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. तर आता नेरळ शहरात वाढत्या चोरीच्या घटनांनी नेरळ पोलिसांची डोकेदुखी वाढीस लागली आहे.
दरम्यान या दोन्ही घटनांबाबत नेरळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होऊन नेरळ पोलिसांकडून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते. तर या चोरीचा तपास नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर करत आहेत. तसेच आता या चोरांचा बंदोबस्त नेरळ पोलिस कसे आणि कधी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.