
उरण ( प्रतिनिधी )
रायगड जिह्वा औद्योगिक दृष्ट्या विकसित होत असताना, या जिल्ह्यात अनेक विकास कामांना सुरुवात होत आहे. मात्र हि कामे सुरु होण्याआधी स्थानिक भूधारकांसोबत कोणतीही चर्चा झाली नसून, भूसंपादनाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याने होणाऱ्या विकासाला विरोध होत आहे. अलिबाग ते विरार दरम्यानच्या बहुद्देशी कॉरिडॉरच्या भूसंपादसाठी सोमवारी उरणच्या बैलोंडाखार परिसरात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता मोजणी सुरू केली होती. ही मोजणी येथील शेतकऱ्यांनी उधळवून लावून भूमापन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना पिटाळून लावले. तसेच जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तो पर्यंत कोणतेही काम करू देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अलिबाग – विरार या महामार्गासाठी उरण तालुक्यातील दादर पाडा, वैश्वि, दिघोडे, विंधणे,भोम,चिरनेर,कलंबूसरे व कोप्रोली परिसरातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादीत करण्यात येणार आहेत. या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. याची सुरुवात महसूल विभागाने केलेल्या सुनावणी ने झाली आहे. या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी अलिबाग विरार कॉरिडॉर बाधीत संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. सोमवारी दादर पाडा परिसरातील बैलोनडा खार परिसरातील जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमापन अधिकारी व खाजगी एजन्सीचे कर्मचारी आले होते. याची माहीती मिळताच समितीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी जमा होत.शासनाने सुरू केलेली मोजणी बंद केली. तसेच जो पर्यंत भूसंपादन अधिकारी या संदर्भात बाधीत शेतकरी आणि समिती सोबत चर्चा करीत नाही,आणि यातून तोडगा निघत नाही. तो पर्यंत अलिबाग विरार
बहुद्देशी कॉरिडॉर च्या जमीनीची मोजणी किंवा याची कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये अशी मागणी केली आहे. यावेळी अलिबाग विरार कॉरिडॉर समितीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष ठाकूर व सचिव रवींद्र कासुकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉरिडॉर साठी सक्तीचे भूसंपादन होणार ?
उरण परीसरातील जमिनीची मोजणी ही शासनाने सुरू केली आहे. ही मोजणी झाल्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल. यात संमतीने भूसंपादन करण्यात येईल. मात्र संमती न मिळाल्यास सक्तीने ही भूसंपादन होईल अशी माहीती, अलिबाग विरार कॉरिडॉर चे भूसंपादन अधिकारी व उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली.
