अलिबाग :-अमूलकुमार जैन
रायगड जिल्हा हा शिवसेनेचा कायमच अबाधित बालेकिल्ला राहिलेला आहे. हे सातत्या कायम राखताना छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागाळात पोहचवण्याचे काम अधिक वेगाने सुरु होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी दिली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आ. भरत गोगावले, संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांनी पक्षसंघटन वाढीसाठी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर जिल्हा प्रमुख राजाभाई केणी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणुक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाचा दबदबा अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांना संघटीत होण्याचेही आवाहन राजाभाई केणी यांनी केले आहे. हिंदवी स्वराज्यासाठी रक्षणासाठी ज्याप्रमाणे जीवाची बाजी मारत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पाठीशी हजारो मावळे खंबीरपणे ऊभे होते, अशीच तळमळ हिंदवी स्वराज्याच्या सरक्षणासाठी येथील शिवसैनिकांच्या मनात आजही कायम आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी ही तळमळ वेळोवेळी दाखवून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगावर काटे उभा करणारा संघर्ष, त्यांचे जाज्वल्य विचार, पराक्रम आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण प्रत्येक गाव आणि गावातील प्रत्येक कुटुंबामध्ये पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी यावेळी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या भेटीत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी कोणती भूमिका योग्य राहणार आहे, यावरही जिल्ह्यातील उपस्थित नेत्यांनी आपले मत मांडले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले विचार मांडले आहेत. हे विचार पक्षसंघटन वाढीसाठी खूपच फायद्याचे ठरु शकतात, असे राजाभाई केणी यांचे म्हणणे आहे.अलिबाग येथे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांच्या समवेत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीसाठी दक्षिण रायगड मधील युवासेना जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा संघटिका, युवती जिल्हा संघटिका, उप जिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, महिला तालुका संघटिका, युवासेना तालुका अधिकारी, विधानसभा मतदारसंघाचे संघटक, सर्व शहर प्रमुख, उप तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजा केणी यांनी केले आहे.