उरण, प्रतिनिधी

कामाचा दर्जा तपासुन सदनिका घ्या
उरण तालुक्यामध्ये नवीन शेवा, बोकडवीरा हद्दीमध्ये सिडाकोच्या द्रोणागिरी नोडची निर्मिती झापाट्याने होत आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई नंतर आता उरणच्या द्रोणागिरी नोडकडे विकासकांनी लक्ष केंद्रित केले आहे. नफा कमावण्यासाठी झटपट इमारती उभ्या रहात आहेत. मात्र घाईघाईने आणि कामातील तृटिंमुळे येथील इमारती खचून वाकड्या होतं असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सदनिका घेताना कामाचा दर्जा तपासुन सदनिका घ्या.
सदनिका घेताना कामाचा दर्जा आणि पूर्णत्वाचा दाखला तपासा
तिसऱ्या मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून बेलापूर, उरण आणि पनवेल विभागातील जमिनी संपदीत करून, विकासाला सुरुवात केली. यामध्ये पनवेल आणि बेलापूर पट्ट्यात मोठा विकास झाला असून, उरण तालुक्यात देखील विकासाला गती आली आहे. मात्र येथील द्रोणागिरी नोडमध्ये होत असलेल्या विकासकामांमध्ये विकासकांकडून कामात चालढाकाल केली जात आहे. कमी वेळात जास्त फायदा होण्यासाठी इमारतींच्या कामांमध्ये चालढकल करण्यात येऊन, नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात येत आहे. यामुळे येथील इमारती दर्जा राखून तयार होत नसल्याचे दिसून येत आहे. अशाचप्रकारे कामात कसूर ठेऊन उभ्या केलेल्या इमारती खचल्या जात असून, नागरिकांच्या जीवाला धोकेदायक बनल्या आहेत. काही वर्षांपूर्वी फुंडे गावालगत असणाऱ्या सेक्टर 14 मधील एक इमारत खचून वाकडी झाली होती. परिणामी ही इमारत कोसळली होती. या इमारतिमध्ये रहिवाशी नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र सध्या एका दिशेला झुकलेल्या इमारतींमध्ये रहिवाशी राहण्यास आले असून, त्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. यामुळे अशा विकासकांना कोणताच आणि कुणाचाही धाक राहिला नाही. येथील अनेक मोठमोठ्या इमारतीनां बांधकाम पूर्णत्वाचा परवाना नसतानाही बेधडकपणे विकासाकांकडून सदनिका वास्तव्यासाठी खुल्या करून देण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे विकासक इमारती उभ्या करून, त्यातील सदनिकाची विक्री करून, सदनिका तात्काळ हसतांतरित करून इमारतींचा ताबा देत आहेत. त्यानंतर आपली कोणतीच जावबदारी नसल्याचे म्हणत हात वर करत आहेत. यामुळे सदनिका घेण्याआधी कामाचा दर्जा तपासुन आणि पूर्णत्वाचा दाखला पाहूनच सदनिका खरेदी कराव्या योग्य ठरणार आहे.
