खोपोली, प्रतिनिधी
रविवारी आयोजित खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी जात असलेल्या श्री सदस्य रस्ता ओलांडत असतांना भरधाव कारची धडक बसून अपघात घडला. यात चंद्रकांत नरहरी तारळेकर – 65, रा. विटा जिल्हा सांगली या श्री सदस्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विटा जिल्हा सांगली येथील काही श्री सदस्य रविवारी खारघर येथे आयोजित डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी पुण्यकडून खारघर कडे जात होते. हे सदस्य चहापाणी करण्यासाठी खालापूर टोलनाक्या मागील फुडमॉल येथे थांबले . चहापाणी झाल्यावर हे सदस्य रस्ता ओलांडून पलिकडे जात असताना यातील चंद्रकांत नरहरी तारळेकर – वय 65, यांना पुणे बाजूकडून येणाऱ्या कारचा अंदाज न आल्याने त्यांना कारची जोरदार धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती ज्या कारची धडक बसली त्याच कार चालकाने कर्तव्य म्हणून द्रुतगती महामार्ग वाहतूक पोलीस व कंट्रोल रूमला दिली .या बाबत खोपोली पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून , पुढील तपास सुरू आहे.