विरेश मोडखरकर
काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं
पुण्याहून मुंबई, गोरेगावकडे निघालेल्या खाजगी बसला पुणे,मुंबई जुन्या मार्गावरील बोरघाटामध्ये अपघात झाला, आणि होत्याच नव्हतं झालं. पहाटे चार वाजता गाढ झोपेत असताना हा अपघात झाल्याने संपूर्ण अंधार, जवळपास अडीचशे फूट खोल दरी, घनदाट जंगल, जखमींच्या किंचाळ्या आणि काही क्षणातच चक्काचूर झालेली बस या परिस्थितीमध्ये मदतीसाठी आरडाओरडा करणारे सहकारी, विचार केला तरी अंगावर काटा उभा राहील अशी परिस्थिती त्या निर्जनस्थळी काही सेकंदातच निर्माण झाली. बचाव कार्य पूर्ण झालं. मात्र या अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एक आठ वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे. अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या. मात्र या अपघातामधील तेरा मृत्यूंना जवाबदार कोण? हा सवाल सातत्याने उपस्थित होत आहे.
अपघात होऊन मोठी जीवित हानी झाल्यावरच उपाय योजना होणार का?
मुंबई, गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोलताशा पथक आणि भटकंती वादक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी वादनाचा जल्लोष करून, मध्यरात्री दोन वाजता एका खाजगी बसमधून पुण्याहून मुंबईसाठी प्रवास सुरु केला. थकलेले वादक बसच्या सीटवर बसताच काही क्षणातच झोपून गेले. कुणालाही माहीत नव्हते कि आपल्यामधील काही सहकाऱ्यांचे डोळे पुन्हा कधीच उघडणार नाहीत. प्रवास सुरु झाला आणि बस जुन्या मुंबई, पूणा मार्गावरून बोरघाट मार्गे अवजड वाहनांना प्रवासासाठी बंदी असतानाही सुसाट धावत होती. बोरघाटामधील शिंग्रोबा मंदिरामागील घाटामधील अवघड वळणावर बस आली आणि बसवरील चालकाचा ताबा सुटला क्षणातच बस जवळपास अडीचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये तेरा वादकांनी कायमचे डोळे बंद केले. यामध्ये एका आठवर्षीय लहानग्याचा समावेश आहे. तर एका माउलीने आपल्या दोनही मुलांच्या मृत्यूच्या कागदांवर सह्या केल्या आहेत. एकूण तेरा मृतांमध्ये तीन मुलींचा देखील समावेश आहे. तर दहा मुले आहेत. सर्व जण आठ ते बावीस या वयोगटातील असून, अठ्ठावीस जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटना स्थळावरून माहिती घेतली असता, या अपघातामधून बालबाल बचावलेल्या काहीजणांशी बोलल्यावर पुढील माहिती समोर आली आहे. या बसमध्ये तीन वादक हे खोपोली येथील राहणारे असून, त्यांना खोपोली येथे सोडायचे होते. यासाठी बस जुन्या मुंबई, पुणे मार्गावरून वळवण्यात आली होती. तर ही बस अवजड वाहनांना प्रवासासाठी बंदी असणाऱ्या मार्गावरून प्रवास करीत होती. अशा प्रकारचा प्रवास नेहमीच अवजड वाहतूक करणारी वाहने एक्स्प्रेस मार्गावरील टोल वाचवण्यासाठी करत असतात. मग बंदी असतानाही त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? रस्त्यांवर बेकायदा कट्स कशासाठी? एरवी लहान वाहनांवर कारवाईचा बडगा उगारणारी वाहतूक पोलीस यंत्रणा अवजड वाहतुकीवर मेहरबान का? हे सवाल आपसूकच निर्माण होत आहेत. अपघातानंतर प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून, धोक्याच्या ठिकाणी अपघात रोधक कठडे आणि अवजड वाहनांनी प्रवेश करुनये यासाठी हाईट गेट बांधण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचना शासकीय अधिकारी, आय.आर.बी., वाहतूक शाखा, पोलीस यंत्रणा यांच्याकडून माहिती घेऊन पहणी दरम्यान दिल्या आहेत. घटनास्थळी सर्व अधिकारी या सर्व धोकादायक गोष्टींवर विचार करतात आणि माहिती पुरवतात, मग या गोष्टींचा आधीच विचार करून त्यावर उपाय योजना तयार केल्या असत्या तर आज अवजड वाहतुकीस बंदी असणाऱ्या मार्गाने बस आली नसती, आणि तेरा जणांना आपला जीव गमवावा लागला नसता, हि वस्तुस्थिती आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. मात्र ज्यांनी आपल्या व्यक्तीला गमावले आहे, त्या व्यक्तीची भरपाई कुणालाच करता येणार नाही. या अपघाताची चौकशी करून, दोषींवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या कोणत्याच दुर्घटना होऊनये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र या उपायोजना करण्यासाठी तेरा जणांना जीव गमवावा लागला हि दुःखाची बाब आहे. उराशी मोठी स्वप्न घेऊन चव्वेचाळीस युवकांनी ढोलताशा वादन ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातून भविष्यात त्यांनी स्वतःचं विश्व् निर्माण करण्याची स्वप्न पाहिली होती. त्या अनुषंगाने त्यांची वाटचाल देखील सुरु झाली होती. पुणे येथे त्यांना मिळालेली सुपारी त्यांची मुंबई बाहेरील पहिलीच सुपारी होती. त्यांना माहीत देखील नव्हते आपल्या स्वप्नातील विश्व् निर्माण करण्यासाठी घेतलेली हि सुपारी त्यांची शेवटची सुपारी असेल. घटना वाईट आहे. मृतांच्या कुटुंबियांना आपल्या गेलेल्या माणसामुळे निर्माण झालेली पोकळी निश्चितच भरून काढता येणार नाही. मात्र शेवटी प्रत्येक जण हाच प्रश्न करत आहे, अपघातामधील तेरा मृत्यूनां जवाबदार कोण?