उरण, प्रतिनिधी
उरण, सोनारी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. पुनम महेश कडू यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रहिवाशांना मदतीचा हात देण्याचा महत्त्वाचा निर्णय, ग्रामपंचायत स्तरावर घेतला आहे.या निर्णयाला सोनारी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीही आपला पाठिंबा दर्शविला असल्याने, सोनारी गावातील रहिवाशांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरपंच सौ. पुनम महेश कडू यांनी माहिती देताना सांगितले की केंद्र व राज्य सरकार गोरगरीबांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवित आहेत.त्याचा एक भाग म्हणून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमूत महोत्सवाचे औचित्य साधून सोनारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील निराधार ( विधवा ) महिलांसाठी धान्य किट वाटप, माझी कन्या सुकन्या ( पहिल्या कन्या रत्नासाठी )ग्रा.पं.मार्फत २५ हजार रुपये संगोपन खर्च, तसेच गावातील मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी खर्च म्हणून १५ हजार तात्काळ सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत मध्ये एक मताने निर्णय घेण्यात आला आहे. आणि तशा प्रकारचे फलक सोनारी ग्रामपंचायत हद्दीत लावण्यात आले आहेत.
सोनारी ग्रामपंचायतीच्या या महत्वाच्या निर्णयाबाबत सोनारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.पुनम महेश कडू, उपसरपंच सौ.रेश्मा नंदकुमार कडू, ग्रामपंचायत सदस्य अंकुश लक्ष्मण तांडेल, जगदिश कान्हा म्हात्रे,रेश्मा दिपक कडू, ममता सुरेश कडू, अश्विनी हरिश्चंद्र कडू,जितेश नरेश कडू, मेघश्याम कडू, ग्रामविकास अधिकारी विनोद मोरे यांचे रहिवाशांनी आभार व्यक्त केले आहेत.