उरण, वैशाली कडू
उरण परिसरात असलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे. अनधिकृत होर्डिंगवर कायदेशीर कठोर कारवाई करावी. तसेच अधिकृत होर्डिंगची वेळोवेळी पाहणी तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करावे असे केलेल्या मागणीत म्हटले आहे.
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की (दि. 18 एप्रिल २०२३) रोजी पिंपरी चिंचवड रावेत परिसरात व मागील काळात देखील पुणे स्टेशन परिसरात होर्डिंग पडून निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. मुळातच व्यावसायिक हेतूने उभारण्यात येणाऱ्या या होर्डिंग्जचा दर्जा व मजबुतीची अधूनमधुन स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. जिथे अनधिकृत होर्डिंग्ज असतील त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.
उरण परिसरात हायवेच्या दुतर्फा अनेक मोठमोठे होर्डिंग्ज उभी आहेत. हे सर्व सिडको व इतर शासकीय जागेत उभी आहेत. तरी या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे.जे होर्डिंग्ज उभी आहेत त्या पैकी किती अधिकृत व अनधिकृत आहेत याची पडताळणी करून अनाधिकृत होर्डिंग्ज उभ्या करणाऱ्या जाहिरात कंपनीवर व धोकादायक होर्डिंग्जवर कारवाई करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
बातमी आवडल्यास शेअर आणि कमेंट्स नक्की करा…