अलिबाग, प्रतिनिधी
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाज माध्यमांवर प्रसारीत करणार्या एकाला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुणे येथून अटक केली आहे. आज अलिबाग कोर्टाने त्याला एक दिवसाती पोलिस कोठडी दिली आहे.

शनिवारी, 22 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले. या पत्रात यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे आवाहन करण्यात आले होते. समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने प्रसारीत होण्यास सुरवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम 500, 501, 505 (2), 505(3) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे 66 सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण स्थानिक गुन्हे अन्वेषशण विभागाकडे वर्ग करण्यात आले. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तपास सुरु केल्यानंतर पुणे येथून सदर तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला अलिबाग न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे