अलिबाग, अमूलकुमार जैन
रोहा तालुक्यातील न्हावे आणि अलिबाग तालुक्यासाठी श्रीगाव विभागासाठी रुग्णवाहिका
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यावतीने अलिबाग तालुक्यातील श्रीगाव आणि रोहा तालुक्यातील न्हावे या विभागांसाठी दोन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या. सदर रुग्णवाहिकांचे लोकार्पण शेतकरी भवन येथे शेकाप जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार म्हात्रे, रोहा शेकापचे तालुका चिटणीस गणेश मढवी, मजदूर फेडरेशन अध्यक्ष हेमंत ठाकुर, अलिबागचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, विद्या म्हात्रे, विलास म्हात्रे, ताडवागळे माजी सरपंच शैलेश पाटील, सुमित माने, शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रिती पाटील व इतर सदस्या आदी उपस्थित होते.
शेतकरी भवन येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाने पूर्वीपासून जनतेसाठी कामे केली आहे. आताच्या काळात काम करणे सापे आहे. मात्र त्या काळात परिस्थिनुसार काम करणे अवघड होते. ठराविक निधींवरच अवलंबून रहावे लागत होते. आता आपण खाजगी निधीतून देखील विकास करत आहोत. न्हावे आणि श्रीगावसाठी उपलब्ध करुन दिलेल्या रुग्णवाहिका या परिसरातील गावांसाठी कुठेही आवश्यकता भासली तर उपलब्ध करा. त्यांचे वेळेवर मेंटेनंन्स करा. एक समिती तयार करून काम करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. या आधी आम्ही दिलेल्या बेलोशी येथील रुग्णवाहिकेमुळे आजवर अनेकांचे प्राण वाचवले याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. सर्वांचे जीव वाचले पाहिजेत, तत्पर आरोग्य सेवा मिळाली पाहिजे या साठी आम्ही कायम तत्पर असल्याचेही मत चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.

शेकापच्या माध्यमातून कोरोना, निसर्ग चक्रीवादळ काळात केलेले काम विसरता येणार नाही तसेच त्यांनी कोरोना काळात हॉस्पिटलची उभारणी करून अनेकांना जीवनदान दिले तर लसीकरण मोहीम राबवून अनेकांना मोफत लसीकरण तसेच मोफत भोजन व्यवस्था केली त्यांचे योगदान अनमोल आहे. जिंदगिके साथ भी, जिंदगिके बाद भी असे शेकापचे काम आहे. अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यात रोजगार मेळावे घेवून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला असे मोलाचे काम शेकापच्या माध्यमातून आजवर करण्यात आले आहे असे प्रास्ताविकात संगितले तर सुत्रसंचलन विक्रांत वार्डे यांनी केले.