खोपोली, प्रतिनिधी (संतोषी म्हात्रे )
मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवरी खोपोली बाह्यवळणावर गुरूवारी दुपारी 12:45 वाजण्याच्या सुमारास तब्बल तेरा वाहनांचा एकमेकांना धडक देत विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सहा जण जखमी झाले असून सुदैवाने एकही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे.वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली बाह्यवळणावर जवळ आज दुपारी 12:45 वाजण्याच्या सुमारास तेरा वाहनांचा विचित्र अपघात झाला अपघात नेमका कसा झाला याचा अद्याप उलगडा झालेला नसला तरी अचानक झालेल्या या अपघातामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहनांची मोठी कोंडी झाली होती. वाहने उतारावर अचानक एकमेकांना जोरात धडकल्याने हा भीषण व विचित्र अपघात झाला. यामध्ये अकरा चार चाकी वाहने व दोन ट्रक अशा तेरा वाहनांचा समावेश आहे. यामध्ये कुंदा सोनवणे (वय- 60 रा.ठाणे),कमल सोनवणे (वय 38 रा ठाणे),हर्षद घानेतकर -वय 25 रा पुणे), सदानंद भोईर (वय 45 रा ठाणे), मंथू थॉमस वय 80 रा पुणे, इल्लेयमा इशू (वय 62 रा पुणे) हे जखमींना खोपोली नगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी हालविण्यात आले.याप्रसंगी खालापूर तहसिलचे नायब तहसिलदार सुधाकर राठोड,खोपोली ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर अपघातग्रस्त टिमचे गुरूनाथ साठेलकर जखमींची व्यवस्था करण्यासाठी उपस्थित होते.
अपघाताची माहिती समजल्यानंतर बोरघाट महामार्ग पोलीस आय आर बी व डेल्टा फोर्स तसेच खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी अपघात स्थळी धाव घेत सर्व वाहनांमधील जखमी व इतर सर्व प्रवासी यांना वाहनांमधून बाहेर काढत उपचारासाठी रवाना केले. सदरची अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.