पनवेल, जितिन शेट्टी
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचे पडसाद पनवेल आणि खारघर मध्ये सुद्धा उमटले आहे. पक्षाच्या पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा राजश्री कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विद्याताई चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे. त्यानुसार पवार साहेब जर अध्यक्ष नसतील तर मी सुद्धा जिल्हाध्यक्ष महिला पदावर काम करणार नाही, अशी प्रखर भूमिका जिल्हाध्यक्ष महिला राजश्री कदम यांनी घेतली आहे.
राजश्री कदम यांनी आपल्या राजीनाम पत्रात म्हंटले आहे कि, मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आपले दैवत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आपली ऊर्जा आहेत व या वयातही त्यांनी संघर्ष करून पक्षाला सर्वोच्च स्थानी नेते तळगाळातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते यांचे प्रेरणास्थान आहेत यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला ही गोष्ट खरोखर धक्कादायक आहे. पवार साहेब हे या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत हे एक सगळ्या क्षेत्रातील विद्यापीठ आहेत. जनसामान्यांच्या हितासाठी साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले आहे आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार करून राजकारणामध्ये महिलांना सन्मान मिळवून दिला.अनेक लोकहिताचे निर्णय साहेबांनी घेतले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून त्यांनी हिमालयासारखे काम केले. मात्र साहेबांनी अचानकपणे राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे माझ्यासह अनेकांना खूप वेदना झाल्या. साहेब अध्यक्षपदावर राहत नसतील तर मी सुद्धा पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा पदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करीत आहे.हा राजीनामा आपण स्वीकारावा ही विनंती प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विद्याताई चव्हाण यांच्याकडे केली आहे.