प्रतिनिधी, वैशाली कडू
उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश; ओएनजीसी कंपनीच्या माध्यमातून बसवण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरा

उरण चारफाटा भागावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उरण चारफाटा शहरातील प्रवेशाचे प्रमुख मार्गावर चारही बाजूने नजर राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ओएनजीसी प्रशासनाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. यामुळे उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीची दखल ओएनजीसी कंपनीने घेऊन उरण शहरातील प्रमुख चौक म्हणून समजल्या जाणाऱ्या उरण चारफाटा येथे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. याबद्दल पत्रकार संघाने ओएनजीसी कंपनी प्रशासनाचे आभार मानून इतर कंपनी प्रशासनाने अशाप्रकारे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. यामुळे उरणचा चेहरामोहरा पूर्णपणे बद्दलताना दिसत आहे. यामुळे उरणमध्ये परप्रतियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने गुन्हेगारीचे प्रमाण ही वाढणार आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारी पोलीस यंत्रणेची शक्ती अपुरी पडणार आहे. याचा सारासार विचार करून उरण शहरात व तालुक्यातील प्रत्येक गावाभोवती सीसीटीव्हीची नितांत गरज आहे. उरणचा चेहरामोहरा बदलत असतानाच जेएनपीए बंदराबरोबर डीपीवर्ल्ड, जीटीआय, बीपीसीएल,सिंगापूर पोर्ट, एनएडी, ओएनजीसी आदींची निर्मिती झाल्याने आयात निर्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने ती लवकरात लवकर होण्यासाठी उरण परिसरात कंटेनर यार्डचे जाळे विणले गेले. त्यामध्ये काम करणारा कामगार वर्ग हे स्थानिकांपेक्षा परप्रतियांचा वावर जास्त आहे. तसेच लवकरच रेल्वे व नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तसेच सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची उभारणी झाल्याने उरणचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. याचबरोबर या परिसरात पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. हे सर्व सुरू झाल्यानंतर पोलीस ठाण्यात वाढ केली नाहीतर पोलीस यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानंतर उरणचा शांतता बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने या परिसरात वास्तव्यासाठी परप्रतियांचा मोठ्या प्रमाणात भरणा झाला आहे. यातील काहीजण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. वाढत्या विकासाबरोबर शांतता सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढते अपघात, चोऱ्या, घरफोड्या, दरोडे, खून हाणामारी अशा घटनांच्या वाढ होणार आहेत. या घटना घडल्यानंतर कोणताही ठोस पुरावा पोलीस यंत्रणेला मिळत नसल्याने गुन्हा उघड होण्यास विलंब होतो किंवा तपासही लागत नाही. यामुळे नागरिकांचा रोष पोलीस यंत्रणेवर राहतो. हे सर्व टाळण्यासाठी किंवा याला आळा घालण्यासाठी उरण शहराबरोबर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये गावात व गावाभोवती सीसीटीव्ही बसविणे अत्यावश्यक बनले आहे. सीसीटीव्ही बसविल्यानंतर एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्यामागचे सूत्रधार व आरोपीना लवकरात लवकर जेरबंद करणे शक्य होईल, त्याचबरोबर अशा घटनांना आळा घालता येईल. याचा सारासार विचार करून शासकीय यंत्रणेने सीसीटीव्हीची नितांत गरज लागणार असल्याने ही मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने लावून धरली होती. याची दखल उरण ओएनजीसी कंपनी प्रशासनाने घेऊन उरणमधील प्रमुख रहदारीचा मार्ग समजल्या जाणाऱ्या उरण चारफाटा येथील हायमास्ट दिव्याच्या पोल वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात होणाऱ्या कोणत्याही घटनांची माहिती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार आहे. परिसरातील छोटी मोठी गुन्हेगारी पाहता सीसीटीव्हीची गरज वाढली आहे. बसवल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासोबतच गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे. कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करत असल्याने कोणताही परिसर याच्या नजरेतुन सुटत नाही. सदर सीसीटीव्ही ओएनजीसी कंपनी प्रशासनाने जरी बसविले असले तरी त्याचा फायदा उरणच्या जनतेला निश्चित होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर कंपनी प्रशासनाने पुढाकार घेऊन आपल्या कंपनी बरोबर जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती.