काळ आला होता पण वेळ आली नव्हती

इतर नागरिकांच्या जीविताला धोका पोहचुनये यासाठी गावात शिरलेल्या बिबट्याला पकडताना घडलेलया चित्तथरारक घटनेला आज १३ वर्षे पूर्ण झाली. आजही त्या आठवणी तशाच आहेत.

    मी विरेश मोडखरकर, पेशा पत्रकारिता असला तरी निसर्ग संवर्धन आणि वन्यजण रक्षण हा ही तितकाच जिव्हाळ्याचा विषय. तो दिवस होता ११ मे  २०१० सकाळी साधारणी ८:०० वाजताच्य सुमारास "फ्रेंड्स ऑफ नेचर" या वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष, माझे मित्र जयवंत ठाकूर याने मला फोन करून उरणच्या करंजा गावामध्ये बिबट्याचा शिरकाव झाल्याची माहिती दिली. खरंतर या गोष्टीवर सुरुवातीला विश्वास बसला नव्हता. मात्र खात्री करावी म्हणून फोन करून चौकशी सुरु केली. एबीपी माझा या वृत्तवाहिनिला काम करणारा माझा भाचा आशिष घरत याला फोन करून विचारणा केली असता, तो त्या ठिकाणी असून, बिबट्याने खरंच गावात शिरकाव केला असल्याचे सांगितले. तर या दरम्याम बिबट्याने गावातील सात जणांना जखमी केले होते. मी लागलीच कारंजा गावात जाण्यासाठी निघालो. गावाच्या अगदी मोक्याच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या पडीक इमारतीमध्ये हा बिबट्या लपून बसला असल्याची माहिती मिळाली. वनखात्याचे अधिकारी,कर्मचारी ठिकाणावर हजर होते. तर पोलीस यंत्रणा जमलेल्या गांवकऱ्यांच्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत होते. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या सांगण्यानुसार तो बिबट्या होता. मात्र खात्री व्हावी आणि त्याच्या लपण्याचे ठिकाण कळावे यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. यावेळी वनाधिकारी पाटकर यांनी पुढाकार घेत पोलिसांची ढाल (कवच) आणि काठी हातामध्ये घेऊन, बिबट्याचे लपून बसण्याचे ठिकाण कळावे यासाठी त्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या वरच्या माळ्यावर जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाटकर यांच्या मागोमाग शेलकर हे पोलीस अधिकारी हातामध्ये काठी घेऊन या मोहिमेमध्ये सामील झाले. माळ्याच्या पायऱ्या  चढून वर जाताच बिबट्याला चाहूल लागली आणि त्याने पाटकर यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी पाटकर यांच्या हातामध्ये शिल्ड असल्याने त्यांना बिबट्याला रोखून धरण्यात यश आले होते. मात्र तरी देखील बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये पाटकर यांना बिबट्याची नखे लागून दुहापात झाली होती. तर बिबट्याने हल्ला केलेला पाहताच पोलीस अधिकारी शेलकर यांनी तात्काळ मागे पळून पाटकर यांना खाली येण्यासाठी मोकळीक दिली. आता बिबट्या पुन्हा त्या पडीक इमारतीमध्ये लपून बसला होता. मात्र आता हा प्राणी बिबट्याच असल्याची खात्री झाली होती. बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे बघ्यांची मोठी गर्दी येथील भागात जमा झाली होती. तर गावामध्ये त्यादिवशी नऊ लग्न असल्याने खूप रेलचेल होती. सर्व माध्यमांचे मीडिया कर्मी माझे सहकारी बातमी संकलनासाठी प्रत्यक्ष ठिकाणांवर उपस्थित राहून लाईव्ह रिपोर्टींग करत होते. तर पनवेल येथून आमचा मित्र शार्दूल वारंगे हा देखील करंजा  गावात येऊन ठेपला होता. शार्दूल हा देखील प्राणीमित्र आहे. या दरम्यान जयवंत, आशिष, मी, शार्दूल, किशोर, रघु, राहुल आम्ही वनखात्याशी सल्ला मसलत करून घराला मासे पकडण्याच्या जाळ्याने कव्हर करण्याचा निर्णय घेतला. यावेळी किशोर पाटील याने नागावात जाऊन स्वतःकडे असणारे जाळे आणून ते जाळे लावण्यास मदत केली. यामध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे करंजा  गाव हे मासेमारांचे गाव असून, या गावामधील अनेकांशी बोलून जाळे मागण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून ज्यांचा जीव वाचवत होतो तेच आमची चेष्ठा करत होते. असो जाळे बांधण्यात आले. आता मोहिमेत अग्निशामन दल देखील शामिल झाले होते. वेळ होती दुपारी १:०५ ची. अचानक स्फोट झालयाप्रमाणे आवाज आला. आम्ही सर्व मीडियाकर्मी यावेळी एकत्र होतो. मी कुठेतरी सिलेंडरचा स्फोट झाला असावा असे म्हटले तर दुसर्याने लग्नातील फटाके वाजत असल्याचे म्हटले.मात्र काही वेळातच मला फोन आला आणि माहिती मिळाली कि मी ज्याठिकाणी काम करत  होतो त्या वेअर हाऊसमध्ये केमिकलच्या कंटेनरला आग लागून स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये काही कामगार जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली होती. आम्ही तात्काळ सर्व मीडियाकर्मी करंजा गाव सोडून भेंडखळ गावामधील त्या वेरहाऊसजवळ पोहचलो. एकूण १३ स्फोट झाले होते. भयानक आग लागली होती. या स्फोटामध्ये कंटेनरची तुकडे जवळपास २०० मीटरवर पडले होते. तर ३ कागारांचा जागीच मृत्यू झाला होता. महत्वाचे म्हणजे  माझे काम याच वेअरहाऊसमध्ये सुरु होते. मी त्या दिवशी बिबट्याच्या रेस्क्यु अभियानात सामील असल्याने तेथे अनुपस्थित होतो. कदाचित माझी वेळ आली नव्हती. त्या भयाण बातमीचे संकलन करून झाल्यावर आम्ही पुन्हा करंजा येथे आमचा मोर्चा वळवला. संध्याकाळचे ६:४५ मिनिटे झाली होती. बिबट्याला डार्ट करून पकडण्याचे अभियान सुरु होते. मात्र या दरम्यान माझे दोन मित्र शार्दूल आणि जयवंत गंभीर जखमी झाले होते. वनाधिकारी पाटकर यांनी केलेल्या प्रयत्नानंतर वनाधिकारी विनया जंगले यांनी बिबट्या असलेले ठिकाण शोधून त्याला डार्ट करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा तोच जिना, त्याच पायऱ्या आणि तोच माळा. विनया जंगले मॅडम, शार्दूल, जयवंत, पाटकर आणि इतर सहकारी घराच्या पहिल्या माळ्यावर जाताच बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला चढवला. यावेळी शार्दुलने बिबट्याने केलेला हाला पाहिला. हा हल्ला विनया जंगले मॅडम यांच्यावर असल्याचे लक्षात येताच शार्दुलने मॅडमना ढकलून बिबट्याला अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिबट्याने शार्दुलच्या हातावर जोरदार चावा घेतला होता. शार्दूल गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. शार्दुलच्या हाताचे ऑपरेशन करावे लागले होते. आजही शार्दुलच्या हाताची बोटे यवस्थित काम करत नाहीत. 
     दुपारी अग्निशमन दलाच्या शिडीचा वापर करून, घराच्या कौलावर जाऊन बिबट्याचे ठिकाण शोधून त्याला डार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार वनाधिकारी पाटकर आणि जयवंत यांनी कौलावर चढून खाली पाहण्याचा प्रयत्न केला. इमारत मोडकळीस आली असल्याने भीती होतीच, एक एक कौल सारून घराच्य आतील बाजूस पाहण्यास सुरुवात झाली. बिबट्या काही दिसेना. जयवंत क्षणापुरता गाफील झाला आणि याचवेळी लपून बसलेल्या बिबट्याने जयवंतकडे झेप घेत काढलेल्या कौलातून जयवंतचा पाय पाकडला. समयसूचकता दाखवत जयवंतने दुसऱ्या पायाने बिबट्यावर लाथ मारून आपली सुटका करून घेतली होती. मात्र या सगळ्यामध्ये जयवंत गंबीर जखमी झाला होता, आणि बिबट्याने या ठिकाणाहून पलायन केले होते. आता बिट्या दुसर्या पडीक घराच्या मागील बाजूच्या ओटीवर लपला होता. तर जयवंत हॉस्पिटलमध्ये झोपला होता. 
     संध्याकाळी ६:४५ वाजता करंजा गावामध्ये आल्यावर चित्र वेगळेच होते. आता बिबट्या लपून बसलेल्या दुसर्या ठिकाणाला जाळे बांधण्याचा प्रयत्न सुरु होता. यावेळी राहुल हनुमंते हा आचा मित्र पडीक घराच्या कौलांवर बसून जाळे बंधात होता. तर बाकीचे सदस्य वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. वनखात्याने पिंजरा आणून तो पिंजरा बिबट्या असलेल्या ठिकाणी काही अंतरावर ठेवला होता. आता बिबट्याला कसे जेरबंद करायचे याबाबत अनेक गोष्टींवर चर्चा सुरु झाल्या होत्या. तर बघ्यांची गर्दी या अभियानामध्ये त्रासदायक ठरत  होती. मी या अभियानात सक्रिय झालो. मला माहीत नव्हते कि आता पुढे माझा नंबर असेल. राहूलने घराच्या कौलावरून खाली टाकलेले जाळे खालच्या बाजूने मोकळे होते. हे जाळे बांधणे गरजेचे असल्याने, मी हे जाळे बांधण्यासाठी पुढे गेलो. जाळं  बांधत असताना मी आणि बिट्या यांच्यामध्ये फक्त एका भिंतीचे अंतर होते. आजूबाजूच्या इमारतीच्या टेरेसवर बघ्यांनी गर्दी केली होती. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे टेरेसवर जमलेले हे सर्व बघे आम्ही जीवावर उदार होऊन बिबट्याला जेरबंद करत असताना वरून भिंतीच्य प्लास्टरचे तुकडे काढून या बिबट्याला मारत होते. जाळे व्यवस्थित बांधण्यात आले कि नाही याची खातरजमा करण्यासाठी मी एका इमारतीच्या टेरेसवर जाऊन पाहणी केली असता जाळे एका बाजूला फाटलेले असून ते जाळे बांधणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. पुन्हा खाली उतरून जाळे बांधण्याचा प्रयत्न केला असता, आमचा मित्र  "केअर ऑफ नेचर" या संस्थेचा अध्यक्ष राजू मुंबईकर याने फटाक्यांची माळ पेटवू का? असे विचाले . त्यावेळेस मी नको असे उत्तर देऊन राजुला खाली येण्यास सांगितले. आम्ही ठरवले होते, कि जाळे बांधून झाले कि एक एक फटका वाजवायचा म्हणजे बिबट्या आपली जागा सोडून मोकळ्या दिशेने पळेल. हि मोकळी दिशा एका दरवाज्यातून खोलीकडे जाणारी होती. बिबट्या जेव्हा या खोलीत प्रवेश करेल तेव्हा लगेच या खोलीचे दरवाजे बंद होतील असे प्रयोजन करण्यात आले होते. त्यानंतर खोलिच्या  खिडकीमधून बिबट्याला डार्ट  करून जेरबंद करायचे. या दरम्यान राजू मुंबईकर खाली आला आणि त्याने राहुल हणमंते यांच्यकडे फटाक्यांची मा  दिली. राहुलने अगदी माझ्या समोर ज्याठिकाणी बिबट्या बसला होता त्याठिकाणी भिंतीवर फटाक्यांची माळ पेटवली. मी जाळं  बांधण्यात व्यस्त होतो. माळ पेटताच माझं लक्ष पेटलेल्या माळेकडे आणि माझे सहकारी रोहित, राहुल आणि राजू यांच्यकडे गेले. तोवर फटाके वाजायला सुरुवात झाली. बिबट्या दचकला आणि अपेक्षे विरुद्ध झाले. बिबट्याने बांधलेल्या जाळ्यावर झेप घेतली. रोहित आणि राजू अगदी बिबट्याच्या समोर होते. माझ्या हातामध्ये जाळं होत. बिबट्याने पूर्ण ताकदीने जाळ्यावर झेप घेतल्याने माझ्या हातावर ताण आला होता. त्यामुळे मला जाळं सोडायला भाग पडले. मी जाळं  सोडून पुन्हा खेचून धरले. यामुळे रोहित आणि राजुवर होणारा बिबट्याचा हल्ला रोखण्यात यश आले. मात्र क्षणातच भेदरलेला बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी पाळताना अगदी माझ्या समोर येऊन ठेपला. त्याच्या समोर माझ्या उजव्या पायाचा डोफा असल्याने त्याने माझ्या पायाला करकचून चावा घेतला. तर आणखी हल्ला करण्यासाठी पुढे सरसावत असताना, मी बिबट्याला पकडून खाली आपटले. बिबट्याने पुन्हा पळ काढला. आता आणखी तिसरी जागा बिबट्याने पकडली होती. 
   हल्ल्यानंतर राजू मुंबईकर याने आणि माझ्या इतर मित्रांनी मला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. यावेळी मलम पट्टी करून मला सोडण्यात आले तर दुसर्या दिवशी येण्यास सांगितले. यादरम्यान बिबट्याला डार्ट करून जेरबंद करण्यात आले होते. दुसर्या दिवशी तपासणी करण्यासाठी रुग्णालयात गेलो असता, डॉ.तुंगेकर यांचा साला घेण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार डॉ.तुंगेकर यांच्या रुग्णालयात गेल्यावर लक्षात आले कि, माझ्या पायामध्ये संपूर्ण सेफ्टीक झाले आहे. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र माझी प्रकृती गंबीर झाली होती. पेशी कमी झाल्या होत्या. तर मी वेड्याप्रमाणे बडबडत होतो. बिबट्या चावल्यावर काय उपचार करावेत याचा अनुभव नसतानाही डॉ.तुंगेकर यांनी माझ्यावर उपचार सुरु केले. यासंदर्भामध्ये त्यांनी परदेशामध्ये बिबट्या चावलेल्या रुग्णावर झालेल्या उपचारांचा अभ्यास करून माझ्यावर उपचार केले. धोक्याचे संकेत असताना माझ्यावर केलेल्या उपचारांमुळे मी नक्कीच वाचलो होतो. त्यातून माझा पाय निकामी होऊन कायमस्वरूपी अपंगत्व येण्यापासून देखील बचावलो होतो. असे असताना माझ्या पायाचे ऑपरेशन करण्याची गरज निर्माण झाली. पायाच्या वाटी खालून  पस येण्याचे मार्ग तयार झाल्याने गंबीर शस्त्रक्रिया करावी लागेल यासाठी आधीच लस येण्याचे मार्ग मोकळे करून, वाटीखालून लस येण्याच्या वाटा बंद करण्यासाठी हे ऑपरेशन होते. ऑपरेशन झाले, मात्र अडचण होती ती ऑपरेशन नंतर माझी देखभाल कोण करेल? माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असणारे डॉ.आशिष काळे यांना संपर्क केला. त्यांनी माझी पुढील जवाबदारी घेण्याचे सांगितले. त्यानंतर आठ दिवस मी मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. पाय टेकून चालता येण्याइतपत ठीक झाल्यानंतर डिसचार्ज मिळाला. आणि मग जवळपास दोन महिने डॉ.आशिष काळे यांच्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये मलमपट्टी करावी लागली. आज या घटनेला १३ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. एक गोष्ट खरी कि, काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती....... माझ्या या सर्व प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले, माझ्यासोबत मी बरा होईपर्यंत उभे राहिले त्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आशिषने माझ्यावरील हल्ल्याचा केलेला एकमेव व्हिडीओ आजही युट्युबवर पहाता येत आहे. 
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page