रेवदंडा चौल विभागात खुलेआम कांदळवनावर भराव:महसूल विभागासाहित वनविभागाचा कानाडोळा

अलिबाग, अमूलकुमार जैन

रायगड जिल्ह्यातील रेवदंडा चौल विभागात धनदांडगे भु माफिया यांच्याकडून चौल ग्रामपंचायत हद्दीतील चौल दादर येथील सप्त आसरा देवी मंदिर लगत तसेच चौल रेवदंडा बाह्यवलण येथील चौल सजा तलाठी यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कांदळवनावर भराव टाकून कांदळवन नष्ट करीत असतानासुद्धा स्थानिक महसूल विभाग आणि वनविभाग यांच्याकडून जाणीवपूर्वक का कानाडोळा केला जात आहे याचे आश्चर्य स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

   अलिबाग तालुक्यातील रेवदंडा चौल विभागातील चौल ग्रामपंचायत हद्दीतील  रेवदंडा चौल बाह्यवलण  लगत असणाऱ्या  चौल तलाठी सजाचे कार्यलयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चौल दक्षिण भाग तसेच  चौल दादर येथील सप्त आसरा देवीच्या लगत असणाऱ्या जागेतील कांदळवनावर मातीचा भराव टाकण्याचे काम भु माफिया यांच्याकडून राजरोसपणे सुरू असतानासुद्धा स्थानिक महसूल विभाग आणि वनविभाग यांच्याकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे.  चौल रेवदंडा बाह्यवळण रस्त्यालगत खाडी पात्र असल्यामुळे या परिसरात कांदळवनाचे क्षेत्र मोठे आहे. कांदळवनापासून 50 मीटर क्षेत्रापर्यंत भराव, कचरा टाकणे आणि बांधकामे करण्यास मनाई आहे. कांदळवन आणि सीआरझेड पाणथळ परिसर गावाची कवच कुंडले असून भरती किंवा मोठा पाऊस आला तरी ते पाणी आपल्यात साठवून ठेवण्याची या क्षेत्राची क्षमता मोठी आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी जागेतील कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड करून त्या क्षेत्रात भराव टाकण्याचे काम सर्रास केले जात आहे. कांदळवनाची बेसुमार कत्तल आणि कांदळवनाचे क्षेत्र मातीचा भराव टाकून नष्ट करणाऱ्यांविरोधात कारवाई करून महसूल व  वन विभागाने आपले कर्तृत्व दाखवावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

कांदळवन आणि सीआरझेड भागात मातीचा भराव करून पर्यावरणाचा -हास केला जात आहे. कायद्याने असलेली बंदी आणि उच्च न्यायालयाचा आदेश असूनही कांदळवनाची सर्रास कत्तल केली जात असून कांदळवनाचे क्षेत्र मातीचा भराव टाकून नष्ट केले जात आहे. याकडे वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कांदळवनाची बेसुमार कत्तल केली जात असून कांदळवन क्षेत्रात मातीचा भराव टाकून मोठया प्रमाणात कांदळवन क्षेत्र नष्ट केले जात आहे. ही बाब गंभीर असली, तरी याकडे महसूल व वन विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे वन विभागाच्या आशिर्वादाने तर कांदळवनाची कत्तल केली जात नाही ना ? अशा प्रकारचा संशय व्यक्त केला जात आहे.

कांदळवन क्षेत्रात खारफुटीच्या झाडांमध्ये कार्बन डायआॅक्साईड शोषून घेण्याची क्षमता जास्त आहे आणि आॅक्सिजन सोडण्याची क्षमताही जास्त आहे, त्यामुळे पर्यावरणीय परिसंस्थेचे संवर्धन आणि संरक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे :- विरेश मोरखडकर. उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती .

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page