उरणमध्ये आपत्कालीन मदतीसाठीची मुहूर्तमेढ रोवली

उरण, वैशाली कडू

उरण तालुका हा गॅसचा फुगा बनला आहे. त्यामुळे एखादी चूक ही काही क्षणातच होत्याचे नव्हते करील. हे टाळण्यासाठी उरणमधील जागृत सामाजिक संघटना व नागरिकांनी एकत्र येत आपत्कालीन मदतीसाठी हाक देत बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत उपस्थित मान्यवरांनी आपल्या सुरक्षितेच्या दृष्टीने आपत्कालीन वेळेत उरणमधील प्रत्येकजण जागृत राहणे गरजेचे असल्याचे सूतोवाच केले. त्यादृष्टीने पावले उचलत उरणमध्ये आपत्कालीन मदतीसाठी जनतेला जागृत व प्रशिक्षण देण्यासाठीची मुहूर्तमेढ काल रोवण्यात आली. लवकरच या मोहिमेला जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

उरणमध्ये प्रामुख्याने ओएनजीसी, बीपीसीएल, जेएनपीए, एनएडी, जीटीपीएस व इतर अनेक ज्वलनशील कंपन्या व कंटेनर यार्ड कार्यरत आहेत. याची झळ उरणकरांना अनेकवेळा सोसावी लागली आहे. त्यामध्ये एखादी दुर्घटना घडल्यावर उपचारासाठी सुसज्ज हॉस्पिटलची कमतरता जाणवत आहे. भविष्यात यापुढे दुर्घटना टाळण्यासाठी अथवा कमीतकमी हानी होण्यासाठी प्रत्येकाला येणाऱ्या आपत्कालीन घटनेचा सामना करण्याच्या हेतूनेच आपत्कालीन मदतीसाठी जनजागृती करण्याच्या आपत्कालीन ग्रुप बनवून मदतीसाठी प्रयत्न करण्यासाठी काल बैठक आयोजित करण्यात आली होती.
“आपात्कालीन मदतीसाठी” या ग्रुपची पहिली बैठक “आनंदी हॉटेल”, उरण येथे पार पडली. या बैठकीमध्ये डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, सर्पमित्र आणि आपत्तीव्यवस्थापनातील अनुभवी मान्यवाराची उपस्थिती लाभली. या बैठकीची सुरुवात सदस्यांच्या ओळखीने झाली. तर डॉ.सुरेश पाटील, डॉ.सत्या ठाकरे, डॉ.घनशाम पाटील यांनी बचावकार्य करताना रुग्णांना सुरुवातीलाच प्राथमिक सेवा कशी देता येईल याबाबत मार्गदर्शन देऊन सहभागी होणाऱ्या सदस्यांना याबाबत प्राथमिक प्रशिक्षण देण्यासाठी पुढकार घेणार असल्याचे सांगितले.
आपत्तीव्यवस्थापनाबाबत दांडगा अनुभव असणारे सिव्हिल डिफेन्स मधील सेवानिवृत्त विलास पाटील यांनी आपल्या कार्यासाठी सदस्यांना कशाप्रकारचे प्रशिक्षण आवश्यक आहे आणि ते का? घेणे गरजेचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. अतुल बोन्द्रे यांनी पर्यावरणासह आपल्या तालुक्यातील उर्वरित डोंगर उदा. द्रोणागिरी पर्वत यांचे संरक्षण झाले पाहिजे आणि हा सुद्धा आपात्कालीन व्यवस्थेचा एक भाग असुशकतो असे मत मांडले.
काल आयोजित केलेल्या पहिल्याच बैठकीमध्ये उपस्थित मान्यवर सदस्यांनी दिलेल्या प्रतिसादमुळे आपल्या ग्रुपचे उद्दिष्ठ नक्किच साध्य करण्यासाठीचे एक पाऊल पुढे पडले आहे असे म्हणता येईल. यावेळी “फ्रेंड ऑफ नेचर” संस्थेच्यावतीने सापांबाबत समज/गैरसमज याबाबत जयवंत ठाकूर, निकेतन ठाकूर आणि राकेश म्हात्रे यांनी व्याख्यान दिले.
विशेष म्हणजे या बैठकीत गोरख म्हात्रे हा सर्पमित्र उपस्थित होता. गोरख वडील गेल्याची बातमी समजून कार्यक्रमात खंड पडू नये यासाठी शेवटापर्यंत बसून होता. कार्यक्रम संपताच कुणाला कळू न देता निघून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्या मोबाईल स्टेस्ट्सवर वडील मयत झाल्याचे समजले. मात्र वडील मयत झाले तरीही सर्प सेवेत त्याने खंड पडू न देता आपले दुःख बाजूला ठेऊन त्याच रात्री 12.09 वाजता गोवठणे गावात एकाच्या बेडरूममध्ये अतिजहाल फुरसे साप असल्याचा कॉल आला होता. त्याच्या रेस्क्यू साठी गोरखने त्याच्या मुलाला पाठवले. तसेच सकाळी पाले गावात एक छोटा अजगर व पाले गावातच जाळयात अडकलेल्या घोणस सापाची सुटका गोरख कुटुंबियांकडून झाली. यावरून फॉन-निसर्ग सेवेसाठी सदैव तत्पर हे संस्थेचं ब्रीदवाक्य गोरख म्हात्रे यांनी सार्थ ठरविले आहे. तरी गोरख म्हात्रे यांच्या कार्याला उरणवासीयांकडून त्रिवार सलाम. यावरू नक्कीच उरणमधील आपत्कालीन मदतीसाठीची रोवलेली मुहूर्तमेढ नक्कीच मजबूत होईल असा विश्वास वाटत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page