खोपोली, भक्ती साठेलकर
आपत्ती व्यवस्थापन रायगड विभागाने अतिवृष्टीमुळे खालापूर तालुक्यातील “ग्रुप ग्राम पंचायत बीड – खुर्द”, खोपोली शहरातील “सुभाष नगर” आणि “काजूवाडी” या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा गंभीर इशारा दिलेल्या गावात रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी अजित नेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांबू जातीच्या झाडांची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक 12 जुलै 2023 रोजी खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि खालापूर तालुका वन अधिकरी कुलदीप पाटकर यांच्या हस्ते ग्रुप ग्राम पंचायत बीड – खुर्द येथे संपन्न झाला. यावेळी खालापूर तालुक्याचे निवासी तहसीलदार सुधाकर राठोड, उपसरपंच गौरव दिसले व त्यांचे सर्व सहकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच वनविभागाच्या कर्मचारी वर्गासह ग्रामस्थ उपस्थित होते.
वन संवर्धनातून निसर्गाचा कोप थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प हाती घेऊन बांबू लागवडीतून आपत्तीचा सामना करण्याची अभिनव संकल्पना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन या निमित्ताने तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.