खोपोली, भक्ती साठेलकर
खोपोली शहराचे उपनगर असलेल्या लव्हेज या गावालगतच्या माळरानावरची ऐतिहासिक दगडी बांधणीची विहिर “अस्पृशांसह सर्वत्रांस खुली” या सामाजिक संदेशाने सर्वदूर चर्चेत आली आहे. या विहिरीचे संवर्धन आणि साफसफाई करणाऱ्या ग्रामस्थांचे कौतूक करण्यासाठी दि. 12 जुलै 2023 रोजी वासुदेव बळवंत फडके, शाळा क्रमांक 8 – लव्हेज येथील सभागृहात खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी हे उपस्थित होते.
सामाजिक सद्भाव जपण्याच्या हेतूने शेकडो वर्षांपूर्वी “अस्पृशांसह सर्वत्रांस खुली” असा ऐतिहासिक संदेश देणाऱ्या लव्हेज गावातील तत्कालीन समाज सुधारकांचा आदर्श आजदेखील प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन करताना त्यांनी दर्शविलेल्या पदपथावर सर्वांनी मार्गक्रमण केले पाहिजे असा मनोदय आयुब तांबोळी यांनी व्यक्त केला. आपण कार्यक्रमाचे साक्षीदार झाल्याचा स्वतःला अभिमान वाटतो आहे असे सांगून असा जाज्वल्य वारसा जपणाऱ्या ग्रामस्थांचे कौतुक केले.
लव्हेज ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या अभूतपूर्वक कार्यक्रमास खालापूर तालुक्याचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दूरे, खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शितलकुमार राऊत, सहा. पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर हे देखील उपस्थित होते.
ऐतिहासिक विहिरीची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्य लव्हेजकर लहान थोर बंधू भगिनीनी गर्दी केली होती, उपस्थित मान्यवरांचे जंगी स्वागत करत त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात देखील आले.