अलिबाग, अमूलकुमार जैन
महाड तालुक्यातील खरवली – नवीन वसाहत येथील घटना
महाड एमआयडीसी हद्दीमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तीन-चार दिवसांपूर्वी ढालकाठी येथे एका 32 वर्षीय इसमाने गळफांस घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच दिनांक 22 जुलै रोजी एका 25 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साक्षी ज्ञानेश्वर मालुसरे असे गळफास घेणाऱ्या महिलेचे नाव असून साक्षीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिव समर्थ नगर, नवीन वसाहत, खरवली येथील आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने साक्षी हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर घटनेची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळ गाठलं व घटनास्थळाचा पंचनामा करून सदरच्या मृत्यूची अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.सदर मृतदेह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.