उरण, प्रतिनिधी
सुमारे दोन लाख नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उरण मध्ये कोप्रोली येथे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूग्णालय आहे.परंतु या रुग्णालयात आजतागायत कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका यांची नियुक्ती करण्यात आली नाही.त्यामुळे तुटपुंज्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांना रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करून घेण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.तसेच तालुक्यातील ग्रामीण गावातील आठ उप केंद्रात रिक्त असणारी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका,मदतणीस ही पदे मागणी करुनही आजतागायत भरली न गेल्याने तुटपुंज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रायगड, नवीमुंबई येथील उरण हा डोंगर-खाडीकिनारी वसलेला तालुका आहे.या तालुक्यात भात शेतीची कामे करणारे आगरी, कोळी, कराडी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहत असले तरी आदिवासी बांधव ही मोठ्या संख्येने डोंगर परिसरात वास्तव करत आहेत.सध्या पावसाळ्यात या परिसरात साथीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्पदंशाचे प्रमाण ही वाढत आहे.अशा जनतेच्या, रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली च्या रुग्णालयात शासनाच्या डोळेझाक कारभारामुळे आँपरेशन विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी मशिन आदी अत्यावश्यक साधन-सुविधांचा वानवा आहे.त्यात सध्या पावसाळ्यात छतातून,भिंतीतून झिरपणारे पावसाचे पाणी, पाण्याच्या टाकीला लागलेली गळती, त्यामुळे रुग्णालयात असणारी पाण्याची टंचाई, रेंगाळत पडलेले इमारतीचे काम, डॉक्टर, परिचारिका याची रिक्त पदे अशा अनेक समस्यांनी एकमेव अशा प्राथमिक आरोग्य केंद्राला सध्या वेढले आहे. त्यामुळे रुग्णालयात ये – जा करणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे.
तरी दोन लाख लोक संख्येच्या उरण तालुक्यात ३० हजार लोकसंख्या च्या मागे एक असे एकूण चार उप प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी आणि दिघोडे येथील रेंगाळत पडलेल्या उप प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मार्गी लावण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली व तालुक्यातील आठ उप केंद्रात आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, मदतणीस यांची रिक्त असणारी पदे भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री उदय सामंत तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी विंधणे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी बांधवांचे नेते बी एम ठाकूर यांनी केली आहे.