प्रतिपंढरपूर समजले जाणारे भेंडखळ येथील विठ्ठल मंदिर

प्रतिनिधी, अजय शिवकर

उरण मधील भेंडखळ गावात १८६५ साला दरम्यान धाकुल फकिर घरत हे विठ्ठल भक्त असे गृहस्थ राहत होते, त्यांची विठ्ठलावर खूप श्रद्धा म्हणूनच की काय आपल्या मुलाचं नावही विठ्ठलच ठेवले. त्या काळी ह्या भागात बापुशेठ नावाच्या मुसलमान माणसाच्या मालकीची तीन मिठागरं होती. एक काळ असा आला की मिठाला भावच नव्हता, मिळकत कमी आणि मेहनत जास्त, १०० किलोची १ गोणी अश्या २७ गोणींचे ५ रूपये मिळत. फायदा नसल्यामुळे आता बापुशेठ मिठागराकडे लक्ष देईनासा झाला. त्या वेळी धाकुल घरत बापूशेठला भेटून मी करू का? असा प्रस्ताव ठेवला. बापूशेठला माहित होत यात फायदा काहीच नाही, उलट नुकसानच होईल तू कर आणि तुच खा असे सांगितले. बस्स मग काय धाकुल यांना तीन आगराची ही एकूण ४० एकर जमिन मिळाली. धाकुल पडले विठ्ठल भक्त. जिथे तुकोबांची लाज ज्याने राखली तर तो काय धाकुल ला असाच सोडणार ? आणि काय चमत्कार सांगावा त्याच वर्षी मिठाचे भाव ५ गुणाने वाढले. बापूशेठ ने धाकुलला बोलावून घेतले त्यांना ती जमीन परत घ्यायची होती, पण धाकुल इतकच म्हणाला, शेठ तुम्ही वचन दिले होते मला, असे असेल तर सर्वां-समक्ष आपल्याच हातावर थुंकुन परत गिळा. आता मात्र बापुशेठ ओशाळला त्याची चुक त्याला कळाली त्याने पूर्ण जमीन धाकुलच्या नावे केली. ही सर्व कृपा त्या पांडुरंगाचीच हे जाणून १८९० साली आपल्या घरा-शेजारीच मंदिर बांधून त्यात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना केली. तेव्हा पासून गावातील आधी पासून असणाऱ्या हनुमान मंदिरातील सप्ताह मंडळ ह्या मंदिरात स्थलांतर झाला ,ह्या मंडळाची स्थापना १८६८ ला झाली होती. म्हणजे आता १५० वर्ष पूर्ण होतील .

धाकुल नंतर ही जबाबदारी त्यांचा मुलगा विठ्ल यांच्यावर आली. पण म्हणतात ना “दैव जाणीले कुणी ” घरत परिवाची परिस्थिती ढासळली. त्यांच्याने ही जबाबदारी झेपेनाशी झाली ,मग कुटुंबाच्या विचाराने मंदिर १९३४ ला पूर्ण गावाच्या ताब्यात देण्यात आले. विठ्ठल घरत यांच्या मृत्यूनंतर परत ही जबाबदारी मुलगा नामदेव यांनी उचलली. तेव्हा विठ्ठल घरत यांच्या पत्नी मानकुबाई यांनी ४० एकर जमीनीतुन २० एकर जमीन मंदिरासाठी दान केली, आणि परत पूर्ण गावाने नव्या जागेवर ह्या मंदिराचा १९५७ साली नव्याने जीर्णोद्धार करण्यासाठी मंदिर बांधले. पण तिथे देवाने कौल दाखवला ,सर्व मूर्ती उचलता आल्या पण गणपती ची एवढी छोटीशी मूर्ती उचलायच सोडा मूर्त हलत सुद्धा नव्हती. पूर्ण गाव हा चमत्कार बघायला जमला. शेवटी स्थापनेसाठी गुलसुंदे येथून आलेल्या ५ ब्राम्हणांपैकी एकाने सुचविले की या जागेच्या मालकाने एकदा प्रयत्न करावे. त्यावेळी नामदेव घरत यांनी फक्त दोन हाताने हलकेच मूर्तीला उचलली. हा सर्व प्रकार बघून गावकरी अचंभीत झाले. आता सगळ्यांना कळून आले होते की हे देवस्थान पुरातनच नाही तर जागृत ही आहे. आता विधी, कार्य नामदेवांच्याच हस्ते होऊ लागल्या. पुढे १९७९ ला नामदेवांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा उद्धव यांनी ही जबाबदारी स्वीकारली .
.आता काही वर्षापूर्वी पूर्ण गावाने आणि काही दानिक लोकांनी या मंदिराचा भव्य दिव्य स्वरूपात पंढरपूर प्रमाणे बदल घडवून आणला.असे हे भेंडखळ गावातील पुरातन जागृत देवस्थान प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व भाविक-भक्तांनी या विश्व -पालनहाराचे दर्शन घेऊन आपले आयुष्य सफल करावे.

अजय शिवकर
केळवणे पनवेल
दू.७९७७९५०४६४

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page