अलिबाग, अमूलकुमार जैन
आठ जिल्हयात एक तरी आयएएस अधिकारी बनावा; गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहित

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवड निर्माण व्हावी आणि उच्च पदापर्यंत पोहचावं या उद्देशाने गेल्या १० वर्षापासून सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था पुढाकार घेऊन दरवर्षी तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळाचे आयोजन केले जाते.
सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन सोहळाचे आयोजन सुधागड पाली येथील आदिवासी ठाकूर समाज भवन येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. या गुणगौरव व मार्गदर्शन सोहळामध्ये आदिवासी वसतिगृह विद्यार्थी व विद्यार्थींनीचा मोठा सहभाग होता. इयत्ता १०वी, १२वी, पदवी तसेच अन्य शैक्षणिक क्षेत्रात चांगल्याप्रकारे गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देवून त्यांचा मन सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी आता भविष्यात काय केलं पाहिजे? शैक्षणिक प्रगती कशी होईल? शैक्षण घेतल्यानंतर समजाचे काय देणं लागतंय? स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे जायचं? वसतीगृहातील प्रवेश आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात देखील अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय, धर्मा फाऊंडेशन व जुहू सुपरफिट यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
