वारसा भक्ती परंपरेचा भेंडखळ हरिनाम सप्ताहाचा

प्रतिनिधी, अजय शिवकर

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. याच महिन्यात जास्त सण आल्यामुळे भाविक या महिन्यात जास्त व्रत करतात. म्हणूनच श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटले जाते. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे. तुकोबा ज्ञानोबा अशा अनेक संतांचे रचनात्मक अभंग अखंडपणे सात दिवस ताल मृदुंग वीणा यांच्या गजराने संपूर्ण आसमंत दुमदुमून चोहो बाजूचा परिसर भक्तिमय होऊन जातो. महाराष्ट्रातील कित्येक गावात ठिकठिकाणी हा हरिनाम सप्ताह साजरा केला जातो.

उरण तालुक्यातील भेंडखळ या गावी पूर्वापार चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह जास्तच विशेष आहे. कारण १५५ वर्षापूर्वी वाड-वडिलांनी चालू केलेला हा सप्ताह आजच्या नवीन पिढीने त्याच संस्काराने आणि त्याच पद्धतीने व भक्ती भावनेने चालू ठेवला आहे. ८९० सभासदांच्या चार-बाऱ्या अखंड सप्ताहात हरिनामाच्या भजनात आठवडाभर तल्लीन होऊन रंगून जातात. आठवडाभर कुठे एका क्षणालाही मृदुंग कधीही थांबत नाही. सप्ताहचा शेवटचा दिवस म्हणजे जन्माष्ठमीचा अंत्यत पारंपारिक रीतीने सर्व लोकांच्या उपस्थितीत रात्री १२ च्या दरम्यान कृष्ण जन्माष्ठमीचा हा सोहळा पार पडतो. सोहळा म्हणजे लोकांसाठी पर्वणीच जणू. त्यानंतर असतो तो गोपाळकाला, म्हणजेच काला. एक अविस्मरणीय डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा.काय ती गर्दी, काय तो उत्साह, ढोलांच्या आवाजावर थिरकणारी तरुणाई, हंडी फोडण्यासाठी उडालेली झुंबड, हंडी फुटल्यानंतर होणारा जल्लोष अगदी अवर्णनीय. अगदी भाग्याचा क्षण, १८६८ साली म्हणजे १५५ वर्षांपूर्वी सात-आठ लोकांनी लावलेली हरिनामाची ही वेल आता आभाळा एवढा वटवृक्ष म्हणजे ८९० सदस्य झाले आहेत. या सोहळ्यात अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत अगदी भक्ती भावाने आणि उत्साहाने सामील होतात. तसेच कितीही मद्य पिणारे अथवा मांसाहार करणारे असोत, या सप्ताहाच्या काळात पूर्ण गाव शुद्ध शाकाहारी व सात्विक बनून निर्मळ व पवित्र मनाने हा उत्सव साजरा करतात. खरचं आदर्श घेण्या सारखा आहे. सर्व सदस्यांचा एकच आणि अगदी साधा पेहराव म्हणजे हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट डोक्यावर टोपी आणि तीही मांगल्याचे आणि पावित्र्याचे प्रतीक म्हणजे पूर्ण सफेद.

फार पूर्वीच्या काळी गरीबी, अपुऱ्या सोयी, अस्वच्छता यामुळे पावसाळ्यात हमखास कॉलरापटकी -हायजा अशा अनेक रोगांची साथ येत असे. त्यावेळच्या अनेक संत महापुरुषांनी जनजागृती करून लोकांना स्वच्छतेकडे वळवून रोगराई पासून दूर ठेवले. त्यावेळी पंजाब वरून आलेले धर्म प्रसारक महान संत जीवन मुक्त स्वामी यांनी अनेक गावांना रोगमुक्त करण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यास प्रयत्न केले. त्यातीलच एक उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील अखंड हरिनाम सप्ताह… जो आजतागात १५५ वर्षे होऊन्ही त्याच उत्साहाने व भक्तीभावाने सुरू आहे. त्यावेळचे ग्रामस्थ शंकर गणा ठाकूर-भिलू धोंड्या ठाकूरलक्ष्मण कुशा ठाकूर-केशव महादेव भोईरनामदेव विठ्ठल घरत, शिवराम कुशा ठाकूर,यादव शिवराम ठाकूर, शंकर बाळ्या भोईर
हरिभाऊ लक्ष्मण ठाकूर व इतर कडू भगत म्हात्रे यांनी१८६८ साली सर्वप्रथम हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. त्यावेळी दामोदर हरि चांदोरकर हे (पुजारी) होते.
आज १५५ वर्षानंतर
१) श्री. उद्धव नामदेव घरत
२) श्री. काशिनाथ शिवराम ठाकूर
३) श्री अशोक शंकर भोईर
४) श्री गोपाळ जनार्दन ठाकूर
यांच्या नेतृत्वात ८९० सदस्य मनोभावे आणि तन्मयतेने अखंड हरिनामाच्या प्रवाहात स्वतःला वाहून घेत आहेत. तसेच
श्री. चंद्रविलास बळीराम घरत हे सचिव म्हणून कार्य सांभाळत आहेत. आधीच्या लोकांनी स्वच्छतेसाठी व रोगराई दूर होण्यासाठी सुरू केलेला हा हरिनाम सप्ताह आत्ता इतके वर्ष होऊनही गाव सर्व क्षेत्रात अग्रगण्य असूनही, आणि मुख्य म्हणजे गावाला आदर्श स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाला आहे. तरीही आपल्या पूर्वजांनी दिलेला वारसा अविरत आणि अखंड चालू ठेवल्याबद्दल संपूर्ण युवा पिढीचा आदर्श आजूबाजूच्या गावातली लोक घेत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page