गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

अलिबाग, जिमाका

  • राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदीचे आदेश निर्गमित
  • जिल्ह्यात 1 लाख 2 हजार खासगी तर 271 सार्वजनिक मंडळाचे गणपती
  • उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क

जिल्ह्यात 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 2 हजार खासगी तर 271 सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार असून पोलीस व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्कता राखत वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना वाहतूक बंदीचे व वाहतूक नियोजनाचे दिनांक निहाय आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील गणेशोत्सव साठी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे , जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सुसज्ज झाली असून पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय विभागांनी गणेशोत्सव आनंदात व सुव्यवस्थित होण्यासाठी उपाययोजना व नियोजन पूर्ण केले आहे.
गणेशोत्सव 2023 शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गणेश उत्सवाचे पूर्वतयारी जोरात सुरू असताना प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राखणे, गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे, कोकणामध्ये खास गणवेशोत्सवासाठी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करणे या दृष्टीने सतर्क झाले आहे.
गणेश भक्तांचा प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून
पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट, 10 सुविधा केंन्द्र, 10 क्रेन, अॅम्ब्युलन्स एकूण वॉर्डन 450 व होमगार्ड 100 नेमण्यात आले आहेत. यासह खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापुर ,माणगाव , लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी.,पोलादपुर या ठिकाणी सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंन्द्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष , आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल.
वैदयकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैदयकिय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओ.आर.एस. आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. येथे महामार्ग चौपदरीकरणाचे प्रगतीचे फोटो गॅलरी द्वारे प्रदर्शन करण्यात येईल.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. 16 टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. यानुसार 16 सप्टेंबर 203 रात्री 12 वाजेपासून ते 19 सप्टेंबर 2023 रात्री बारा वाजेपर्यंत तसेच 23 सप्टेंबर 203 सकाळी 8 वाजेपासून ते 25 सप्टेंबर 2023 रात्री 8 वाजेपर्यंत तसेच 28 सप्टेंबर 2023 सकाळी 8 वाजेपासून ते 30 सप्टेंबर 2023 रात्री 8 वाजेपर्यंत आदेश अंमलात राहणार आहेत. यासह 20, 22 , 26 व 27 सप्टेंबर 2023 रोजी दिवसा बंदी घातण्यात आली असून सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांना वाहतूक करता येणार नाही.
या गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस, पाच दिवस ,सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसाचे 28 सप्टेंबर 2023 रोजी आणि 21 दिवसाचे गणपती 10 आॅक्टोबर 2023 रोजी यानुसार विसर्जनाचे दिवशी होईल. यासाठी सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. यातील समुद्रावर 52 गणेशमुर्ती विसर्जन, खाडीमध्ये 105 गणेशमुर्ती विसर्जन, नदीमध्ये 244 गणेशमुर्ती विसर्जन, तलावामध्ये 100 गणेशमुर्ती विसर्जन व इतर ठिकाणी 94 गणेशमुर्ती विसर्जन होणार आहे . या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडून सुविधा नियोजन व उपायोजना करण्यात येत आहे.
जिल्हयात 271 सार्वजनिक गणपती व 1,02,581 खाजगी गणपती स्थापना होणार आहे.
दि 28 रोजी अनंतचतुर्थी गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे. जिल्हयात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असुन विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्याकरीता पोलीस ठाण्याच्या हददीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
गणपती उत्सवादरम्यान जिल्हयात पोलिस,होमगार्ड, एसआरपीएफ, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. या कालावधीत दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी
एटीबी व एटीसी चे पथक नेमण्यात आले असुन सोशल मिडीया देखरेख करण्याकरीता सायबर
सेल सतर्क आहे. प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. शांतता कमिटी बैठका मोहल्ला कमिटी बैठका घेतल्या आहेत. मंडळ बैठका, गावभेटी, दंगाकाबू पथकाने रंगीत तालीम, रुट मार्च करण्यात येत आहेत .

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page