उरण, नागेंद्र म्हात्रे
मंगळवार दि. 12/9/2023 रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाले, येथे “आजी आजोबा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

एखाद्या कुटुंबात मायेच्या संस्काराचा अभाव फक्त आजी आजोबा भरून काढू शकतात. प्रत्येक मुलाला लहानपणी आजी-आजोबांचा किंवा घरातील वडीलधाऱ्या माणसांचा सहवास मिळायलाच हवा ! असे आजी, आजोबा जे नातवंडांवर बिनशर्त प्रेम करतात, त्यांना गोष्टी सांगतात, आई वडील ओरडले की लाड करतात, संस्कारांची पेरणी करतात. हे आजी आजोबा कुटुंबातील सर्वात महत्त्वाचा भाग आहेत. आज शाळेतील मुलांना व त्यांच्या आजी-आजोबांना ही आनंदाची व त्यांच्या प्रेमाची अनुभूती अनुभवता आली ती शाळेतील शिक्षकांमुळे. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे औक्षण करून, त्यांच्याबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आजी आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद भरभरून वाहत होता. प्रवेश व हार्दिक या विद्यार्थ्यांच्या आजीने आजीबाईचा बटवा आणून मुलांना औषधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली. त्यानंतर सौ.चैताली म्हात्रे यांनी आजी आजोबांसाठी मनोरंजनात्मक खेळ घेतले. यावेळी आजी-आजोबांना शाळेच्या वतीने छोटीशी भेट वस्तू देऊन त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी पाले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पलता म्हात्रे, सहशिक्षिका सौ चैताली म्हात्रे व अनेक विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी देखील आमच्या मुलांमध्ये हे प्रेमरूपी, कृतज्ञतात्मक संस्कार रुजवित असल्याबद्दल शाळेचे व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
बातमी आवडल्यास सबस्क्राईब, शेअर आणि लाईक जरूर करा….