उरण, अजय शिवकर
उरण तालुक्यात गेली ८२ वर्ष खोपटे पाटीलपाडा येथे शिवकृपा गौरा मंडळाच्या वतीने गौरापूजनाची प्रथा अखंडपणे सुरु आहे. उरण पूर्व विभागांतील खोपटेगाव हा त्याकाळी अत्यंत दुर्गम भाग ओळखला जात असे. खोपटा खाडीमुळे उरण तालुक्याचे झालेले दोन भाग आणि सुर्यास्तानंतर किनाऱ्या वरून जाण्या-येण्याचा बंद होणारा मार्ग अशा परिस्थितीत पाटील पाड्यामध्ये सन १९४१ मध्ये मुख्य संस्थापक-रामजी तुकाराम पाटील, रघुनाथ पोशा पाटील, विश्वनाथ नामा पाटील, जनार्दन गोविंद पाटील, रामभाऊ बाळाराम भगत, दादू सावळाराम पाटील, जगन्नाथ हसुराम पाटील माजी सरपंच, जयराम नारायण पाटील यांनी आपल्या २० सहकार्यासह गणपत गोवर भगत यांच्या निवासस्थानी गौरापूजनाचा सोहळा सुरु केला. आज या उत्सवाला ८२ वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या ८२ वर्षात या मंडळाचे सर्व संस्थापक सदस्य हयात नाहीत परंतु त्यांनी सुरु केलेल्या या सोहळ्याच्या परंपरेचा वसा युवा पिढीने तितक्याच ताकदीने पेलला आहे. सुमारे २० वर्षा पूर्वी पनवेलचे दानशूर परेशशेठ डेढीया यांनी स्वखर्चाने कै.गणपत गोवर भगत यांच्या निवास्थानाच्या जागेवर शिव मंदिराची निर्मिती केली. मंदिरात शिवलींगाच्या स्थापने बरोबरच गणपती आणि शिव-पार्वतीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. शिवगौरा मंडळ नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात. गेली ८२ वर्षे गौरापूजन सोहळ्यात काशीखंड, रामायण, महाभारत, पांडव प्रताप, शिवलीला अमृत गणेशपुराण या पौराणिक ग्रंथाच्या आधारे एखाद्या आख्यायिकेची निवड करून त्याच्यावर आधारित चित्रदेखावे तयार करून कथा सादर करण्याची परंपरा खोपटे पाटीलपाडा गावात आजही कायम आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य स्थापनेचा देखावा, रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ असे देखावे उभारण्यात आले होते. आजही खोपटे पाटीलपाडा गावांतील ग्रामस्थानी आणि युवकांनी आपल्या पूर्वजांनीसुरु केलेली शिवगौरा पूजनाची परंपरा अखंडितपणे सुरु ठेवली आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होते. घराघरांतून गणरायाचे स्वागत होत असताना, आपल्या लाडक्या लेकाचे पृथ्वीतलावर मोठ्या जल्लोषात होणाऱ्या स्वागतामध्ये गुंग झालेल्या आपल्या बाळाला परत नेण्यासाठी गौराईमाता भाद्रपद शुद्ध सप्तमीस न विसरता येते. या गौराई मातेच्या स्वगताला आपण सारेजण असतोच परंतु शिवपुराणांतील संदर्भ केवळ गौरी-गणपतीचे आगमन पृथ्वीवर झालेले दाखवत नाही, तर आपल्या पत्नी-पुत्राचे पृथ्वीतलावरील स्वागत पहाण्यासाठी भगवान शंकरही भाद्रपद शुद्ध सप्तमीला पृथ्वीतलावर येतात, ही अख्याईका असली तरी महाराष्ट्रात काही ठिकाणी भगवान शंकराची गौरा पूजा भाद्रपद शुद्ध अष्टमीला करण्यची प्रथा आहे.
मंदीरात भाद्रपद शुद्ध सप्त ते व्दादशी पर्यंत गौरापूजन सोहळा संपन्न होतो. या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये मंदिरात शिवगौरा अभिषेक दुपारी बारा वाजता मध्यान आरती करण्यात येऊन सोवळ्याचा शुभारंभ करण्यात येणार असतो . याकाळात गौरा अंगात येण्याची प्रथा असल्याने पूजेच्या पहिल्या दिवशी मंदिरात व मंदिराच्या परिसरांत महिलांना प्रवेश निषेध असतो यंदा सावळ्या कुंभाराच्या अवीट भक्तीचा सुंदर देखावा दाखविण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतूनच नव्हे तर मुंबई नवी मुंबई ठाणे पनवेलसह रायगड जिल्ह्यातून लोक या गौरापूजन सोहळ्या साठी येतात या ठिकाणी सर्वधर्म समभावाची भावना जपली जाते. पाच दिवसात या ठिकाणी भजन-कीर्तन सांकृतिक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वाद्यवृंद असे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात पहिल्या दिवशीच्या पारायणा नंतर गौरा पूजन असलेतरी शेवटच्या दिवशी मात्र पायात चाळ बांधून नाच, म्हणजे बाल्या नाचला महत्व आहे. या नाचा नंतरच उत्सवाची खऱ्या अर्थाने सांगता होते. दुसन्या दिवशी पारायणा नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. याचा लाभ खोपटे ग्रामस्थानसह पंचक्रोशितील भाविक मोठ्या संख्येने घेतात. शिवकृपा गौरा मंडळ खोपटे पाटीलपाडा आणि ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्यावतीने हा पाच दिवसांचा सोहळा शुक्रवार २२ ते मंगळवार २६ सप्टेंबर पर्यंत साजरा करण्यात येत आहे.