चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना पोलीस यंत्रणेकडून शासकीय मानवंदना

उरण, वार्ताहर

गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा ९३ वा स्मूतीदिन कार्यक्रम सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी चिरनेर गावातील स्मृतीस्तंभा जवळ मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्म्यांना शासकीय मानवंदना, सलामी म्हणून उरण पोलीसांकडून बंदुकीच्या २१ फैरी हवेत झाडण्यात आल्या.

ब्रिटिश सत्ते विरोधात शांततेच्या मार्गाने लढल्या गेलेल्या रणसंग्रामात उरण तालुक्यातील धाकू गवत्या फोफेकर ,नाग्या महादू कातकरी – ( चिरनेर),आलू बेमट्या म्हात्रे – (दिघोडे),आनंदा माया पाटील- (धाकटी जुई),रामा बामा कोळी- ( मोठीजुई),मोरेश्वर रघुनाथ शिंदे(न्हावी) – (कोप्रोली),परशुराम रामा पाटील -( पाणदिवे) व हसुराम बुद्धाजी घरत- (खोपटे) या आठ शूरविरांना चिरनेर गावातील आक्कादेवीच्या माळरानावर वीर मरण प्राप्त झाले.या रणसंग्रामाच्या स्मूतीना उजाळा मिळावा व युवा पिढी समोर आपल्या पुर्वजानच्या इतिहासास स्मरण व्हावे यासाठी चिरनेर ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने स्मूतीदिन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी ( दि२५) साधेपणाने साजरा करण्यात आला.

यावेळी हुतात्म्यांना शासकिय मानवंदना,सलामी म्हणून उरण पोलीस यंत्रणेकडून हवेत बंदुकीच्या २१ फैरी झाडण्यात आल्या, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मूती स्तंभा जवळ पुष्पचक्र आणि हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांकडून व वनवासी कल्याण आश्रमाच्या पदाधिकारी कडून अक्का देवी येथील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

इतिहास प्रसिद्ध चिरनेर गावातील जनतेला अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत असून, गावावर पुर परिस्थितीचं संकट ओढावत आहे. तरी राज्य सरकार, केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या चिरनेर गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने ग्रामस्थांनी यावर्षी हुतात्मा स्मृती दिन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी यावर्षीही रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद, उरण पंचायत समिती अधिकारी वर्ग उपस्थित न राहिल्याने चिरनेर गावातील ग्रामस्थांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार महेश बालदी, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, कामगार नेते भुषण पाटील, उद्योगपती पी. पी. खारपाटील, राजाशेठ खारपाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, मा.सभापती भास्कर मोकल, तहसीलदार डॉ. उध्दव कदम, विस्तार अधिकारी विनोद मिंडे, मनोज भगत, पनवेल कुषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष नारायणशेठ घरत, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शेकापचे पनवेल चिटणीस तथा माजी सभापती राजेश केणी,माजी सभापती नरेश घरत,माजी उपसभापती सौ.शुभांगी सुरेश पाटील, जिल्हा परिषद मा.सदस्य महेंद्र ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम सह हुतात्म्यांचे वारस, ग्रामस्थ,आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page