अलिबाग, अमूलकुमार जैन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत अलिबाग नगरपरिषदेतर्फे अलिबाग समुद्र किनाऱ्यावर श्रमदानातून स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या मोहीमेच्या माध्यमातून अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला.
केंद्र सरकारने १५ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत १ ऑक्टोबरला सकाळी १० ते ११ या एक तासाच्या कालावधीमध्ये श्रमदानातून शहरासह गावागावातील स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या अनुषंगाने अलिबाग नगरपरिषदेतर्फे रविवारी सकाळी दहा वाजता अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील सिद्धार्थ नगर ते कोर्ट इमारत या परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
या स्वच्छता मोहीमेमध्ये अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, वनविभागाचे अधिकारी समीर शिंदे, नायब तहसीलदार अजित टोळकर, डाॅ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य, माजी नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, वनविभागातर्फे कांदळवन प्रतिष्ठान, शाळा-महाविद्यालयीन शिक्षक -प्राध्यापक, विद्यार्थी, एनएसएस, आरएसपी विद्यार्थी, सामाजिक संस्थाचे सदस्य, बँक कर्मचारी यांच्यासह अलिबागकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोहिमेदरम्यान किनाऱ्यावरील विविध प्रकारचा कचरा जमा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी नगरपरिषदेतर्फे देशी वृक्षांच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले.