कर्जत, गणेश पुरवंत
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात रणकंदन सुरू आहे. त्यातच धनगर समाजाने आदिवासींमधील आरक्षण मागितल्याने आदिवासी समाज नाराज झाला आहे. याविरोधात राज्यात आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात देखील सोमवारी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले होते. हजारो आदिवासी बांधव कर्जत येथे जमत त्यांनी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. तर यावेळी धनगर समाजाला आदिवासींमधील आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन देखील कर्जत प्रांत कार्यालयात देण्यात आले.

धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या आरक्षणात समाविष्ठ करण्यासाठी धनगर समाजाकडून मोठया प्रमाणात मोर्चे आंदोलन केली जात आहेत. अशात धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देवु नये अशी मागणी आदिवासी समाजाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाज आता आक्रमक झाला आहे. कर्जत तालुक्यात सोमवार दिनांक ९ ऑक्टोंबर रोजी आदिवासी आरक्षण बचाव समिती कर्जत खालापूर यांच्यावतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरवात कर्जत शहरातील छत्रपत्ती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून झाली. पुढे छत्रपत्ती शिवाजी महाराज चौक, कर्जत मुख्य बाजार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडक यांच्या पुतळ्यास वंदन करत कर्जत पोलीस ठाणे येथून कर्जत उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालया येथे या या मोर्चाने धडक दिली.
आदिवासींमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ नये, समान नागरी कायद्यामधून आदिवासींना वगळा, कंत्राटीकरण, खाजगीकरण रद्द करा, शाळा खाजगीकरण निर्णय रद्द करावा, बोगस आदिवासी नोकरवर्ग यास बडतर्फ करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, आरोग्य केंद्रांची दुरवस्था असून त्यात सुधारणा व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी बिरसा ब्रिगेड रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत शिद हे आपले मनोगत करताना म्हणाले की धनगर समाजातील काही नेते त्यांना त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी समाजाला पुढे करत आहेत. मात्र आदिवासी समाजाला चेपण्यासाठी प्रयत्न केला तर हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. आमच्या आदिवासी महिला या बाजारात भाजी विक्री करताना त्यांना त्रास दिला जातो. बाहेरून आलेली लोक ही घाण पाण्यात भाज्या पिकवून धुवून विक्री करतात. आणि आमच्या आदिवासी महिला या गावठी भाजी विकत असताना त्यांच्या भाज्या फेकून देण्यापर्यंत त्यांची मजल जाते. तर आता आमच्या आरक्षणावर देखील टाच आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही आदिवासी आमच्या मागण्यासाठी संघर्ष करू, संघर्ष आमच्या रक्तात आहे. तर आरोग्य केंद्राच्या दुरवस्था झालेल्या आहेत. ही आरोग्य केंद्रे ही आदिवासींसाठी वरदान असताना दुरवस्थेमुळे त्याचा त्रास हा आदिवासींना होत असतो. तर
उपमुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला घाईघाईत आरक्षणाच गाजर दाखवलं. निवडणुकांसाठी हे गाजर दाखवली जात आहेत. या आरक्षणाच मुद्दा आम्ही हाणून पाडू
जातीपाती वाद निर्माण केले जात आहेत. मराठा ओबीसी, धनगर आदिवासी असे वाद लावून दिले जात आहे. फक्त ४ टक्के आदिवासी रस्त्यावर उतरला आहे. उर्वरित समाज जेव्हा रस्त्यावर उतरेल तेव्हा शासन हादरल्याशिवाय राहणार नाही असा आक्रमक इशारा गणेश पारधी यांनी दिला. तर आदिवासी समाज शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी सादर केले. कर्जत उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार प्रसाद पाटील यांनी ते निवेदन स्वीकारले.
दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणात कर्जत खालापूर तालुक्यातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरत या मोर्च्यात सहभागी झाला होता. तर आदिवासी महिलांनी त्यांच्या पारंपरिक नृत्य व गाणे सादर करत शासनाचा निषेध केला.
यावेळी आदिवासी संघटना कर्जत तालुकाध्यक्ष परशुराम दरवडा, राजिपचे माजी सभापती नारायण डामसे, दत्तात्रेय हिंदोळा, अश्विनी पारधी, कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा, भरत शिद, बिरसा ब्रिगेड रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत शीद, अंनाता वाघमारे, हिराताई पवार, संतोष मेंगळ, नीलम ढोले, यासह आदिवासी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.