पनवेल, केळवणे-अजय शिवकर
केळवणे गावात गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान वाघेश्वर भागात, अगदी लोक वस्ती असलेल्या रहदारीच्या ठिकाणी चक्क बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे परिसरात भीतीचे वाटावरान निर्माण झाले आहे.
☝️☝️☝️हे छायाचित्र वास्तविक नसून संदर्भासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
केळवणे गावाची वाघेश्वर टेकडी ही चिरनेरच्या जंगलाचा पूर्वार्ध भाग आहे. म्हणजेच केळवण्याच्या या टेकडी पासूनच चिरनेरचे जंगल सुरु होते. चिरनेरच्या जंगलात हिंस श्वापदांचा पूर्वापार वावर आहे, सध्या जंगलतोड आणि भूमी उत्खनन यामुळे अनेक जंगली श्वापद आपले ठिकाण सोडून सैरभैर झाले आहेत. अशातच कधी कधी रस्ता चुकून हे श्वापद लोकवस्तीच्या परिसरात दिसून येतात. मागील दहा-बारा दिवसापूर्वी अशीच बिबट्याची पावलं दिघाटी साई दरम्यान लोकांना दिसून आली होती. परंतु आता तर बिबट्याला केळवणे गावात लोकांनी आपल्या घराजवळ बघितले आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
केळवणे वाघेश्वर टेकडी हे पन्नास ते साठ घरांचे, 300 च्या आसपास लोकवस्ती असलेले ठिकाण आहे. गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान एक दहा-बारा वर्षाचा मुलगा दुकानावर गेला असताना, त्याला दोन घराच्या मधल्या गल्लीत बिबट्या दिसला. त्याने आरडाओरडा केल्यावर बाजूच्या घरातील विनोद घरत या युवकाने आजूबाजूच्या लोकांना सतर्क केले. परंतु तेव्हड्यात बिबट्याने तिथून पळ काढला होता. नागरिकांनी एकत्र येऊन या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर गावामध्ये आता बिबट्या दर्शनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दाखल घेत, बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केळवणे गावातून होत आहे.