उरण, घन:श्याम कडू
गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून उरण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळून, फरार झालेल्या सतीश विष्णू गावंड याला नवी मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अटक केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नवी मुंबई पोलिस गावंड याला घेऊन नवी मुंबईत दाखल झाले आहेत. रात्रभर त्याची चौकशी करण्यात आली.

या चिटफंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी सतीश गावंड हा उरण तालुक्यातील पिरकोन गावातील रहाणारा असून, त्याने दोन वर्षांपूर्वी गुंतवणुकीची बेकायदा योजना सुरू केली होती. एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम गुंतविल्यास ही रक्कम ५० दिवसांनंतर ४० टक्के दराने परत देण्याचे प्रलोभन उरण तालुक्यातील गावागावात नेमलेल्या एजंटच्या माध्यमातून नागरिकांना दाखविले होते. आता मुख्य सूत्रधार अटक झाल्याने गुंतवणूकडारांचे पैसे मिळणार का? असा सवाल नाक्या नाक्यावर विचारला जात आहे.
अनेकांनी आपल्या जवळचे दागदागिने, जमिनी विकून तसेच काहींनी कर्ज काढून त्याच्या योजनेत पैसे गुंतविले होते. फेब्रुवारीत गुंतवणूकदाराकडून जमा झालेली कोट्यवधीची रक्कम घेऊन पलायन करण्याच्या प्रयत्नात असताना उरण पोलिसांनी सतीश गावंड आणि शशिकांत गावंड यांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून सुमारे दहा कोटींची रक्कम जप्त केली होती. सतीश गावंड याला उरणची जनता देवमाणूस मानीत होती, त्यामुळे त्याच्याविरोधात कुणीच तक्रारीसाठी पुढे येत नव्हते.
त्यानंतर सतीश गावंड हा न्यायालयाकडून जामीन मिळवून बाहेर आला. त्यानंतर त्याने नवी मुंबईतून पलायन केले होते. पैस परत न मिळाल्याने काही गुंतवणूकदारांनी सीबीडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सीबीडी पोलिसांनी ऑगस्टमध्ये सतीश गावंड याच्यासह गावागावात नेमलेल्या त्याच्या २४ एजंटविरोधात गुन्हा दाखल केला होता.
त्याचा जामीन रद्द करून शोध सुरू केला होता. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दोन महिन्यांपासून गावंड याच्या मागावर होते. अखेर तो मध्य प्रदेशमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना तांत्रिक तपासाद्वारे मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी ट्रान्झीट रिमांड मिळवून शुक्रवारी रात्री उशिरा त्याला नवी मुंबईत आणले.
सतीश गावंड याने काही दिवसांतच पैशाचा पाऊस पाडल्याने जनता डोक्यावर घेऊन देवमाणूस मानीत होती. परंतु काही महिन्यांनी अमाप संपत्ती गोळा करून पसार झाल्याने अनेकांना देशोधडीला लावले आहे. आता सतीश गावंड याला अटक केल्याने आता तरी पैसे मिळतील अशी आशा वाटत आहे. परंतु गणेशोत्सव नंतर नवरात्रोत्सवावरही सतीश गावंड यांच्या चिटफंडचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहे.
