कर्जत, गणेश पुरवंत
कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय आवारात लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास देखील करण्यात येत आहे.
मोहन पुंडलिक गायकवाड(वय ३५ वर्षे रा. मुक्काम बीड, ता. कर्जत, जि. रायगड असे या खाजगी इसमाचे नाव आहे. तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या १० दस्तांच्या साक्षांकित प्रती हव्या होत्या. तर या प्रती देण्याकरिता दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १, कर्जत १, येथील खाजगी इसम मोहन गायकवाड यांनी तक्रारदार यांचे कडे ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत दिनांक १७ ऑक्टोबर रोजी लाचलुतपत विभाग नवीमुंबई यांच्याकडे तक्रार दिली. तक्रार प्राप्त झाल्याने १७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई लाच लुचपत पथकाने सापळा रचत पंचासमक्ष पडताळणी केली असता वर नमूद आरोपी यांनी पंचासमक्ष रुपये ७ हजार लाचेची रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा सापळा कारवाई दरम्यान आरोपी गायकवाड यांना तक्रारदार यांच्याकडून रुपये ७ हजार लाचेची रक्कम दुय्यम निबंधक कार्यालय आवारात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान या कारवाईमुळे मोहन गायकवाड हा खाजगी इसम असून तो दुय्यम निबंधक कार्यालय कर्जत येथील दस्तऐवज हातळण्याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे याबाबत देखील तपास करण्यात येत आहे. सदर सापळा कारवाई यशस्वी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र चे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाल लाच लुचपत विभाग रायगडचे उप अधीक्षक पो. उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलिस हवालदार प्रदीप जाधव, नितीन पवार चालक पोलिस हवालदार रतन गायकवाड, पोलिस नाईक संतोष तम्हाणेकर , महिला पोलिस नाईक उमा बासरे ,योगेश नाईक,सचिन माने, निखिल चौलकर यांनी केली आहे.
बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि कॅमेन्ट्स नक्की करा