नवी मुंबई, सुचित्रा कुंचमवार
नेरुळ येथील ग्रामदैवत असणारी रांजणदेवी आणि करंजादेवी माता या दोन्ही भगिनी ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार 1984 साली ग्रामस्थांनी केला होता, व आता तिथे पुरातन व नव्या वास्तुकलेचा सुरेख संगम साधून भव्यदिव्य असे मंदिर बांधले आहे. 375 वर्षांचा इतिहास असणाऱ्या या देवींना मानणारे भक्त आजूबाजूच्या पंचक्रोशीतून नवरात्रीत व मंगळवारी,शुक्रवारी मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात.

नवरात्रीमध्ये या मंदिरात देवीची दैनंदिन पूजा आरती आदी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते.नवरात्रीत देवीची शृंगारिक अलंकारिक महापूजा केली जाते,नऊ दिवस देवीसमोर घटस्थापना देखील केली जाते.
मंदिराच्या गाभाऱ्यात दोन्ही देवीच्या मध्यभागी एक स्वयंभू पाषाण गणपती मूर्ती आहे हे या मंदिराचे अनोखे वैशिष्ट्य आहे.तसेच मंदिराच्या आतमध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे असणाऱ्या कोल्हापूरची अंबाबाई,तुळजापूरची तुळजाभवानी,माहूरची रेणुका,सप्तशृंगीची सप्तश्रृंगी देवींच्या मूर्ती स्थापित आहेत तसेच आगरी कोळी ग्रामस्थांची कुलदेवी कार्ल्याची एकविरा देखील स्थानापन्न आहे.या सर्वांची रोज षोडपचारे पूजा केली जाते.एकाच ठिकाणी एकाच वेळेस सर्व देवींचे एकत्र दर्शन होत असल्यामुळे या मंदिरात कायम भक्तांची रेलचेल असते.
मंदिराच्या आवारात समोरच 375 वर्षाचे पुरातन पिंपळाचे झाड आहे ज्याचा परीघ अर्धा एकर परिसरात पसरलेला आहे.हे मंदिर शहरी वस्तीतच असल्यामुळे इथे येण्यासाठी सर्व सोयी मुबलक प्रमाणात आहेत तसेच नेरुळ स्टेशनपासून पश्चिम दिशेला हे मंदिर हाकेच्या अंतरावर आहे.
अशा या नवसाला पावणाऱ्या नेरूळच्या ग्रामदेवता मंदिराला आवर्जून एकदा तरी भेट द्यावी असे हे रमणीय,ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण आहे