अलिबाग, अमूल कुमार जैन
मुरुड तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील, आडी पांगाळे या परिसरातील गट नंबर ७९ व गट नंबर ६० या दोन जमीनीवर एका मुंबईस्थित धनिकाने खरेदी केलेल्या समुद्र किनार्या लगतच्या जागेत काम करणाऱ्या ठेकेदाराने अक्षरशः समुद्रावरील तिवरांची (मॅंग्रुज) खुलेआम कत्तल करीत, त्यावर शेकडो डंपर भरून आणलेल्या मातीचा भराव करून, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन तर केले आहे. शिवाय भर समुद्रात बंधार्याचे बांधकाम केले आहे.मात्र मुरुडच्या महसूल अधिकार्यांनी त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्षच केले असल्याची चर्चा नांदगावमध्ये ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात रंगली आहे.
सदर जागेवर यापूर्वी एक छोटीशी डोंगर टेकडी होती.येथे काम करणाऱ्या ठेकेदाराने मुरुड साळाव रस्त्याकडील बाजूला पडदा लावून जेसीबीच्या साह्याने ती फोडून तेथील दगड मातीचा भराव सदर जागेवर केला आहे.विशेष म्हणजे या काळात येथून येणार्या जाणार्या महसूल अधिकार्यांनी डोळेझाक केली. शिवाय ऐन पावसाळी हंगामात दररोज शंभराहून अधिक खचाखच भरलेल्या डंपरने नजीकच्या डोंगरातील वाहून आणलेल्या शेकडो डंपर मातीचा भराव टाकून समुद्रातील तिवरांची अक्षरशः कत्तलच केली आहे.जवळपास महिनाभराच्या काळात येथील रस्त्यावरुन दहा टनापेक्षा अधिक मातीचा लोड भरलेल्या व अनेकदा नांदगावमध्ये वाहतूकीची कोंडी करणार्या मोठमोठ्या डंपरची वाहतूक सुरू असताना स्थानिक महसूल अधिकार्यांनी शासनाला एकतर मोठ्या रकमेची राॅय़ल्टी मिळवून दिली असावी अथवा त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्षच केले असल्याची चर्चाही येथे सुरू आहे.
दांडे तर्फे नांदगावच्या गट नंबर ६० या सरकारी जमिनीवर देखील सदर ठेकेदाराने अतिक्रमण केले आहे.सदर ठेकेदार हा नांदगाव ग्रामपंचायतीचा माजी सरपंच व एक वजनदार नेता असूनही त्याने अशा प्रकारचे अनैतिक काम केल्याची चर्चाही येथे रंगली आहे.