कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्गावर धुळीचे साम्राज्य, रस्त्यालगतच्या घरांमध्ये धुळीचे थरावर थर

अलिबाग, अमूलकुमार जैन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना व वाहनचालकांना मनस्ताप

यात्रांच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्ती करण्याची मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वडे यांची मागणी

कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड दरम्यान असलेल्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून धुळीचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, तसेच या मार्गावरील रस्त्यालगत असणाऱ्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे थर साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर या रस्त्याच्या नूतनीकरण वा दुरुस्ती करण्याची मागणी मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वडे यांनी केली आहे.

कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे वारंवार दुर्लक्ष होत आहे, पावसाळ्यात तर खड्डयांमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती, यावेळी सोगाव, मुनवली येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने खड्डे भरुन प्रवाशांना व वाहनचालकांना तात्पुरत्या स्वरूपात काहीसा दिलासा दिला होता. या मार्गावर कनकेश्वर फाटा, मुनवली, सोगाव, चोरोंडे, टाकादेवी, परहूरपाडा, परहूर व कार्लेखिंड याठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून खडी पसरली आहे, खडीवरून दुचाकी व अन्य वाहने घसरून अपघात होत आहेत, तसेच खड्डयांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व वाहनचालकांना अपघातासह रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांतील नागरिकांना त्रास होऊन मोठ्या प्रमाणात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच या आठवड्यात अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठ्या आवास व कनकेश्वर येथील यात्रा होणार आहेत, यामध्ये 26 तारखेला आवास येथील नागेश्वरची यात्रा आहे, यादिवशी अलिबाग, पेण, पनवेल, रोहा यासोबतच रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकरी मोठ्या उत्साहाने आपल्या बैलगाड्या घेऊन येत असतात, यामुळे यात्रेसाठी बैलगाड्या घेऊन येणाऱ्या बैलगाडी मालकांना रस्ता खड्डेमय असल्याने बैलांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास होणार आहे. शिवाय या बैलगाड्या पाहण्यासाठी बैलगाडी प्रेमींची मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी असते, यावेळी कोरोना काळानंतर व बैलगाडी शर्यतीवरील बंदी राज्य सरकारने मागे घेतल्यामुळे यावर्षी मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच 27 व 28 तारखेला कनकेश्वर येथील यात्रा आहे, या यात्रेसाठी मुंबई, पुण्यासह, रायगड जिल्ह्यातील भाविक आपापल्या वाहनाने लाखोंच्या संख्येने येत असतात. त्यातील बहुतांश भाविक दरवर्षी वर्षांतून एकदाच येत असतात, त्यामुळे ह्या भाविकांना रस्त्याची सद्यपरिस्थितीची माहिती नसते, यामार्गावर शाळेतील विद्यार्थी, प्रवाशी, पर्यटक, आरसीएफ कारखान्यात जाणाऱ्या अवजड वाहने यांची मोठ्या प्रमाणात येजा असते, तरी रस्त्यावरील मोठमोठ्या खड्डयांमुळे व रस्त्यावर खडी पसरल्यामुळे तसेच धुळीमुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर या मार्गावरील खड्डे दुरुस्ती अथवा नूतनीकरण करावे, अशी मागणी मुनवली येथील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वडे, सचिन घाडी यांच्यासह मापगाव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत खोत, अण्णा सातमकर, प्रविण पाटील, यांनी केली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page