कर्जत, गणेश पुरवंत
नेरळ ग्रामपंचायतीला नुकतेच आयएसओ मानांकन मिळाले. जिल्हा परिषदेत हा सोहळा पार पडून १ महिनाही होत नाही तोच ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नेरळ बाजारपेठेत गटार उघडी पडून त्यावर जाळी न बसवल्याने एक नागरिक त्यात पडून गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात त्या व्यक्तीचे पायाचे हाड फॅक्चर असून त्यावर रायगड हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे. तर या प्रकाराबाबत नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीए कडून शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले होते. तर यासह रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटाराचे काम देखील करण्यात आले होते. त्यावर जाळ्या बसवत पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते. त्यांनतर हे काम स्थानिक प्रशासन म्हणून नेरळ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत देण्यात आले होते. तेव्हा या रस्ते आणि गटारे यांची देखभाल ग्रामपंचायत ची आहे. अशात नेरळ बाजारपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ गटार गेले अनेक दिवस उघडे पडले आहे. त्यावर जाळी बसवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. मात्र त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही परिणामी शुक्रवारी सायंकाळी जैन मंदिराचे पुजारी असलेले चंपालाल रावल वय ४२ हे येथून जात असताना उघड्या गटारात पडले त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना पाहताच येथील उपस्थित ग्रामस्थ यांनी तत्काळ त्यांना रायगड हॉस्पिटल येथे दाखल केले. तर डॉक्टरांनी त्यांना तपासून पायाला फॅक्चर असल्याचे सांगितले. बाजारात गेले काही दिवस पथ दिवे देखील नसल्याने पुजारी यांना अंधारात न समजल्याने ते उघड्या गटारात पडले. काही दिवसांपूर्वी सुद्धा एक महिला त्याच गटारात पडली होती. सातत्याने हे अपघात होत आहेत मात्र ग्रामपंचायत लक्ष देत नाही ही परिस्थिती आहे. अपघातग्रस्त या नागरिकांना ग्रामपंचायतीने नुकसान भरपाई द्यावी.आशी मागणी
संदीप उत्तेकर, सामाजिक कार्यकर्ते नेरळ यांनी केली.
सबंधित ठिकाणी पाहणी करण्यासाठी कर्मचारी पाठवले असून तात्काळ त्या ठिकाणी जाळी लावण्याचे काम केले जाईल आसे आश्वासन मंगेश म्हसकर, उपसरपंच नेरळ ग्रामपंचायत यांनी दिले