जागतिक दिव्यांग दिनानिमित्त

कथा आहे दिव्यांग जिद्द आणि चिकाटीची

अलिबाग प्रतिनिधी, अमूलकुमार जैन

कथा आहे दोन्ही पायाने 90%दिव्यांग असलेल्या साईनाथ पवार यांची

साईनाथ पवार यांचा जन्म अलिबागमधील एका सामान्य कुटुंबात झाला. वयाच्या दुसऱ्या वर्षीअचानक ताप आला असता, आई-वडिलांनी जवळच्या डॉक्टर कडे नेले.
डॉक्टरांनी तपासुन इंजेक्शन दिले, मात्र ताप काही कमी होत नाही म्हणून तालुक्याच्या डॉक्टरकडेे घेऊन गेले. तेथेही उपचार केले मात्र काहीच फायदा झाला नाही. वडील कुणी सांगेल तसा उपाय करत होते. देव धर्म, आयुर्वेदिक, अंगारे-धुपारे सर्व प्रकारचे उपचार केले. परंतु काही इलाज झाला नाही. त्यामुळे साईनाथ पवार यांना हाताचा आधार घेत लहान बाळासारखं रांगत चालवे लागत होते. लहान पणापासूनच शिक्षणाची आवड असल्याने आई-वडिलांनी शाळेत घातले. पहिली ते चौथी शिक्षण जवळच्या प्राथमिक शाळेत झाले.

पुढचं शिक्षण घरापासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या हायस्कूलमध्ये घेण्यात आले. घर ते शाळा हे अर्धा किलोमीटरचे अंतराचा प्रवास आईच्या खांद्यावरून सुरु झाला. आई बरोबरच छोटा भाऊ वैजनाथ हा देखील स्वतः खांद्यावर घेऊन शाळेत जाऊ लागला. अशा खडतर प्रवासात दहावीपर्यंत शिक्षण झाले. एक दिंवस जिल्ह्याच्या ठिकाणी अखिल भारतीय भौतिक चिकित्सालय हाजी अली यांचा दिव्यांग चेकअप कॅम्प होता. या कॅम्पला तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की जर ऑपरेशन केलं तर कॅलिपर च्या साह्याने तुम्ही उभे राहू शकता, आणि हे ऐकल्यानंतर आपण देखील आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे असं वाटल्याने घरच्यांना सांगितले. मला माझ्या पायावर शस्त्रक्रिया करायची आहे पहिल्यांदा घरचेही तयार होईना. नातेवाईक मित्रमंडळी सारे घरच्यांना सांगत ऑपरेशन केल्यानंतर काय खरं नाही जीव जाऊ शकतो, परंतु त्यांनी ठरवले रोजचं रेंगाळत मारण्यापेक्षा एकदाच काहीतरी होऊ दे आणि त्याचबरोबर घरच्यांनी साथ दिली 1995 झाली हाजी अली येथे अखिल भारतीय भौतिक चिकित्सालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व प्रकारच्या तपासण्या करून दोन्ही पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळजवळ सहा महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर सहा महिन्यांनी कॅलिपर व कुबड्याच्या साह्याने पहिल्यांदा साईनाथ पवार उभे राहिले. तो क्षण खरोखर लाखमोलाचा आणि आनंदाचा होता. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेना असा झालं होत. जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचा आनंद हा वेगळा होता. त्यांनी आपल्या त्यावेळच्या आनंदाचे क्षण तसेच हृदयात साठवून ठेवले असल्याचे ‘नवराज्य’ सोबत बोलताना सांगितले.

त्यानंतर जवळच्या कॉलेजमध्ये अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाची आवड, जिद्द आणि चिकाटी असल्याने पुढील शिक्षणासाठी घरापासून दहा किलोमीटर अंतर तालुक्याच्या ठिकाणी अलिबाग येथे, जे.स.एम. कॉलेजमध्ये तेरावी चे ऍडमिशन घेण्यात आली. आता रोज कॉलेजला जाण्यासाठी जवळील मित्रमंडळी ही रोज सकाळी जाताना कॉलेजला घेऊन जायची, कॉलेज सुटल्यानंतर घरी आणून सोडायचे. यामध्ये प्रामुख्याने सुरज नारकर, इरफान लोकरे आणि आसिफ आतार, रोज स्कूटरवर आळीपाळीने कॉलेजला घेऊन जात. BA चे शिक्षण पूर्ण झाले. संगणक प्रशिक्षण, मराठी इंग्लिश टायपिंग यासारखे कोर्स पूर्ण केले. शिक्षण कालावधीतच एक चळवळ साईनाथ पवार यांनी सुरु केली होती. पण आपल्या हक्कासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे हे पहिल्या पासूनच मनात होतं. युसुफ मेहर अली सेंटर तारा, पनवेल यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना एकत्र करण्यात आलं, आणि खरी दिव्यांग बांधवांसाठी चळवळ सुरू झाली. आणि मग सर्व तालुक्यांच्या आपल्या दिव्यांग मित्रांच्या साह्याने यांची कोणाचे प्रश्न असतील ते प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोकशाही दिनाला मांडायचे, आणि आपल्या दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवायचं कार्यक्रम सुरू झाला. बरोबरच नोकर भरतीसाठी बऱ्याच परीक्षा दिल्या आणि सन २००६ साली रायगड जिल्हा परिषद मध्ये लिपिक म्हणून निवड झाली. त्यानंतरही दिव्यांग चळवळ ही थांबली नाही. आज आपल्याला नोकरी मिळाली , आपल्याला रोजगार मिळाला त्याचबरोबर इतर दिव्यांग बांधवांनाही आपल्या रोजगार मिळावा यासाठी त्यांनी दिव्यांग मेळावे मार्गदर्शन शिबिरे, वेगवेगळे उपक्रम शासनाच्या मदतीने चालू केले. शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चार वर्षे काम केले. सन 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ते धावत आहेत. त्याचबरोबर इतर दिव्यांगांसाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. दिव्यांग बांधवांविषयी केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दिव्यांग क्षेत्रातील राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. याचबरोबर दिव्यांग क्षेत्राच्या कामकाजाबाबत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत .कोविड कालावधीमध्ये एनजीओ च्या साह्याने सहाशे दिव्यांगांना स्पेशल लसीकरण मोहीम राबवली. आपत्तीच्या काळात, पुर परिस्थितीत कोकणामध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page