उरण, अजय शिवकर
उरणमधून निघणाऱ्या मानाच्या साई दिंडीनंतर, उरण-पनवेल-पेण विभागातील सर्वात मोठी साईबाबांची दिंडी म्हणून ओमसाई पदयात्रा मंडळाची पायी दिंडी प्रसिद्ध आहे. केळवणे गावावरून श्री क्षेत्र शिर्डी येथे निघणाऱ्या दिंडीला चौदा वर्षे पूर्ण केली होत आहेत. त्यामुळे या वर्षी पदयात्री मंडळाच्या वतीने साईबाबांच्या साई भक्तांनी बाबांच्या वचनाच्या आधारावर दिंडीचे सर्व कार्यक्रम करण्याचे योजले आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. १४) दिंडीने केळवणे येथील साई मंदिरातून श्री क्षेत्र शिर्डी इथे मार्गक्रमण केले.
केळवणे साई मंदिरात बाबांच्या आरतीने दिंडीची सुरुवात झाली. सलग नऊ दिवस चालत ही पालखी शुक्रवारी (ता. २२) श्री क्षेत्र शिर्डीला पोहोचणार आहे. या वेळी हजारोंच्या संख्येने भाविक दिंडीत सामील झाले होते. पूर्व विभागातील सर्वात मोठी व उत्साहाने निघणाऱ्या या दिंडीचे विशेष म्हणजे येथे जातीभेद, उच-निच अशी भावना नसते, सर्वधर्म सम भाव या तत्त्वावर सर्व भाविक भक्त एक कुटुंबाप्रमाणे वागतात, विशेष म्हणजे शिस्तबद्ध नियोजन, लहान थोरांचे मानपान व महिलावर्गाचा सन्मान म्हणून ही दिंडी सर्वांचे श्रद्धास्थान बनली आहे
पंधरा वर्षात पदार्पण करणाऱ्या पदयात्रा मंडलाचे चोख कार्य करणारे अध्यक्ष श्री. जगन्नाथ शिवकर यांनी सांगितले की दिंडीचे दैनंदिन कार्यक्रम आरती ,भजन ,पारायण ,धुपारती, आणि भक्तांचे राहणे, खाणे, त्यांची सुरक्षा याचे काटेकोरपणे व्यवस्थापन मंडळाने केले आहे.
पालखी दिंडी परत आल्यानंतर सोमवारी (ता. २५) साई मंदिर केळवणे येथे महापूजा व साई भंडारा आयोजित करण्यात आला आहे. त्याचा सर्व साई भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे.