अलिबाग, अमूलकुमार जैन
पेण तालुक्यासहित इतर ठिकाणी दोन अल्पवयीन मुलिंवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सचिन मोहन गुरव यास विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी २० वर्षाची सक्तमजुरी व रक्कम रुपये ५,०००/- दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदरचा गुन्हा हा दिनांक २३/०२/२०१५ ते दिनांक २६/०२/२०१५ दरम्यान मौजे पेण महाडीक वाडी, ता. पेण, जि. रायगड, व आदर्श अपार्टमेंट, एन.आर. नगर, दिवा, जि. ठाणे तसेच कॉटेज व्हिला बिल्डिंग, तळोजा, ता. पेण येथे घडला आहे. या प्रकरणातील आरोपी नामे सचिन मोहन गुरव याने सदर प्रकरणातील पिडीत मुलींना दिवा रेल्वेस्टेशन येथे बोलावून तेथून त्यांना दिवा एन. आर. नगर येथील आदर्श अपार्टमेंटमधील फ्लॅटवर नेवून त्या अल्पवयीन आहेत हे माहीत असताना देखील तेथे त्यांचे अल्पवयीन असल्याचा फायदा घेवून त्यांना धमकावून त्यांचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले व त्यांना फ्लॅटमध्ये कोंडून ठेवले. तसेच आरोपी सचिन गुरव याने त्याचा मित्र आरोपी नं. २ संतोष उदयसिंग केवट याचे मदतीने पिडीत मुलींना मौजे तळोजा येथील कॉटेज व्हीला या बिल्डींगमधील एका रुममध्ये नेवून तेथे आरोपी सचिन गुरव याने पिडीता क्र.१ हिचा हात पकडून तिचेकडे पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी करून तिचा विनयभंग केला, तर आरोपी क्र. २ संतोष केवट यानेदेखील पिडीता क्र. २ हिचेशी लगट करुन शारीरिक संबंधाची मागणी करुन, तिचा विनयभंग केला. हे न्यायालयासमोर सिध्द झाले आहे. या प्रकरणातील फिर्यादी यांनी पेण पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असता, ह्या प्रकरणी सदर केसचा अलिबाग पोलीस स्टेशनचे यु. एम. भडकमकर, महिला पोलीस उपनिरीक्षक, पेण पोलीस स्टेशन व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन, मोलाचे सहकार्य केले. सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता श्रीमती प्रतिक्षा वडे, यांनी एकूण १३ साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला, त्यामध्ये फिर्यादी, दोन्ही पिडीता, तपासिक अंमलदार यांची साक्ष कोर्टासमोर महत्वपूर्ण ठरली.
आरोपी सचिन मोहन गुरव यास अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश, ए. एस. राजदेकर यांनी दिनांक ३०/११/२०२३ रोजी महत्वपुर्ण निकाल दिला. सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता श्रीमती प्रतिक्षा वडे यांनी सरकारपक्षातर्फे कोर्टासमोर केलेला युक्तिवाद महत्वपूर्ण ठरला. सदर खटल्यातील आरोपी नं. १ सचिन मोहन गुरव याच्यावर भा. द. वि. ३७६ (२) (आय), ३५४(अ) (१) (२), ३६३, ३४२ तसेच पोक्सो कायदा कलम ३, ४, ७, ११(१) या कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. तर यातील आरोपी नं. २ संतोष उदयसिंग केवट याच्यावर भा. द. वि. ३५४(अ) (१)(२), ३४२ तसेच पोक्सो कायदा कलम ३, ४, ७, ११(१) ५(म) ६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. त्यातील भा.द.वि. कलम ३७६ (२) (आय), ३५४ (ए) (१) (२) व पोक्सो कलम २०१२ नुसार कलम ३ सह ४(२) आणि कलम ७ सह ८ प्रमाणे मा. न्यायालयाने पिडीता नं. १ हिचेवर केलेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीस दोषी पकडून २० वर्षाची शिक्षा व रक्कम रुपये ५,०००/- द्रव्यदंड आणि पिडीता नं. २ हिचेवर केलेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीस दोषी पकडून २० वर्षाची शिक्षा व रक्कम रुपये ५,०००/- द्रव्यदंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता प्रतिक्षा वडे, यांनी एकूण १३ साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला, त्यामध्ये फिर्यादी, दोन्ही पिडीता, तपासिक अंमलदार यांची साक्ष मे. कोर्टासमोर महत्वपूर्ण ठरली. तसेच पैरवी कर्मचारी म.पो.शि.प्रियंका नागावकर, पो. ह. सचिन खैरनार, यांचे सहकार्य मोलाचे ठरले.