कर्जत, गणेश पुरवंत
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी हिसकावून नेली होती. या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण होते. तर पोलिसांपुढे देखील चोरटयांनी आव्हान उभे केले होते. त्यामुळे कर्जत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन सोनसाखळी चोरट्याना जेरबंद केलं आहे. मात्र चौकशी दरम्यान हे चोरटे मोक्काचे आरोपी असल्याचे समोर आले आहे. तर चोरट्याने शिताफीने जेरबंद केल्याबद्दल कर्जत पोलिसांचे कौतुक होत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी कर्जत शहरात मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या तीन महीलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने मोटारसायकलवरून दोन चोरटयांनी येवून जबरीने खेचून नेले होते. कर्जत पोलीस ठाणे येथे कॉ.भा.दं. वि.सं.का. कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. या गुन्हयाचे गांभीर्य पाहून गुन्हा उघडकीस आणण्याकरीता उप विभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी एक पथक तयार केले. या पथकात सहाय्य्क पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, पोलीस हवालदार समीर भोईर, स्वप्नील येरूणकर यांचा यात समावेश होता. वरिष्ठांकडून सुचना मिळाल्यानंतर या पथकाने गुन्हयाचा सखोल तपास सुरु केला. गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करून या गुन्हयातील दोन आरोपी पोलिसांनी शोधून काढले. महादेव उर्फ महाद्या गौतम थोरात, वय २१ वर्ष, व चेतन सुनिल पाटील, वय २० वर्ष, रा. खडकी अशी आरोपींची नवे असून त्यांना देहुरोड पूणे परीसरातून अटक करण्यात आली. सोबतच आरोपी यांनी चोरलेला १ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले. आरोपीना कर्जत पोलीस ठाणे येथे आणून चौकशी केली असता ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुणे जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१) (३) (४) अन्वये. मोक्का देखील दाखल आहे.
सदरची कामगीरी विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र प्रविण पवार, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारीविजय लगारे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड सो, यांचे अधिपत्याखाली सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले, पोलीस हवालदार समिर भोईर, स्वप्नील येरूणकर, हर्षद जमदाडे, अण्णासाहेब वडते, पोलीस शिपाई पाटील, चालक रवी लोहकरे या पथकाने केलेली आहे.