नवराज्य, वृत्तसेवा
राम मंदिरात 22 जानेवारीला रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अभिषेक सोहळ्यानंतर संध्याकाळी अयोध्या नगरी दिव्यांनी सजवली जाईल. यावेळी अयोध्येत 10 लाख दिवे लावण्याची तयारी सुरू आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर 22 जानेवारीच्या संध्याकाळी अयोध्या 10 लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. सरयू नदीच्या काठावर मातीपासून बनवलेल्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघणार आहे. याशिवाय, अयोध्येतील घर, दुकाने, आस्थापना आणि पौराणिक स्थळांवर ‘रामज्योती’ प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळतं आहे. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 7 हजार 140 निमंत्रक हजेरी लावणार आहेत. शिवाय 112 परदेशी पाहुणेही या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत. रामनगरी अयोध्येत 150 चार्टर्ड विमान उतरणार आहेत. मोठ्या व्हिव्हीआयपी घडामोडींमुळे अयोध्यानगरीवर छावणीचं रुप आलं आहे. येथे जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विना निमंत्रण कुणालाही अयोध्येत परवानगी नाही. याशिवाय अयोध्येवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. दरम्यान, अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांना राममंदिर ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात येणार आहेत.