३५ वर्षांपूर्वीच्या शालेय मित्र मैत्रिणींनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या सोबत घालवला रविवार!

उरण, अजित पाटील

फळेवाटप , तिळगुळ वाटप आणि जुन्या नव्या गाण्यांची रंगली बुजुर्गासोबत मैफल!!

केवळ व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या उरणच्या पिरकोन हायस्कूल मधील १९८९ च्या दहावी बॅच मधील ३५ वर्षांपूर्वीच्या मित्र मैत्रिणींनी नेरे येथील शांतीवर वृद्धाश्रमातील आज्जी आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले. संक्रातीचे औचित्य साधून रविवारी सुट्टीच्या दिवशी या ३५ वर्षांपूर्वीच्या मित्र मैत्रिणींनी आपला आजचा संपूर्ण सुट्टीचा दिवस या आजी आजोबांसोबत व्यतीत केला . त्यांना फलाआहार आणि तिळगुळ वाटपासह जुनी नवी गाणी गाऊन या बॅच मधील विद्यार्थ्यानी त्या वृद्धाना देखील आपल्यासोबत डोलायला लावले. या ग्रुपचा लाडका गायक देवेंद्र पाटील यांच्या सह वृषाली , राजेंद्र ठाकूर , युवराज पाटील यांनी आपली बहारदार गीते यावेळी सादर करून कार्यक्रमात चार चाँद लावले.

गेली काही वर्षे हा ग्रुप पनवेलच्या नेरे येथील शांतीवन वृद्धाश्रमात जाऊन तेथील आज्जी आजोबांसोबत एक दिवस घालवत असतो. आमच्यातील अनेकांचे आई वडील आज या जगात नाहीयेत, त्यामुळेच या वृद्धांमध्येच आम्ही आमचे देवाघरी गेलेले आई वडील बघत असून, त्याची एक दिवस सेवा केल्याने आई वडिलांची सेवा केल्याचे पुण्य मिळत असल्याची प्रतिक्रिया यावेळी राजेंद्र ठाकूर , विद्याधर पाटील , अजित पाटील आदींनी व्यक्त केली.

उरणच्या पुर्व भागातील पिरकोन हायस्कूल मधील १९८९ च्या दहावी बॅच मधील विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कामा निमित्ताने स्थायिक आहेत. अगदी विरार पासून ते उरण पर्यंत ठिकठिकाणी असलेली ही आत्ता आयुष्याची ५० शी पार केलेली पिढी संपदा ठाकूर या शिक्षिका असलेल्या एका मैत्रीणीने तयार केलेल्या ” मैत्री असावी तर अशी ” या व्हाटस अप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आली आहे. या ग्रुपने आज पनवेलच्या नेरे येथील शांतीवन वृद्धाश्रमाला भेट देत आपला जवळजवळ अर्धा अधिक दिवस तेथील आज्जी आजोबांसोबत व्यतीत केला. यावेळी देवेंद्र पाटील या ग्रुपमधील हरहुन्नरी कलाकाराने आपल्या वाद्यवृंदाच्या माध्यमातून गाणी गाऊन या आज्जी आजोबांना देखील आपल्या सोबत डोलायला लावले आहे. या कार्यक्रमासाठी खास चेन्नई येथून आलेले नासिरभाई यांनी गायलेले ” सुख के सब साथी दुख में ना कोई ” या गाण्याने तर त्या बुजुर्गांसहित कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्याचे ही डोळे पाणावल्याचे दिसून आले. एका वृद्धाने हे गाणे होताच गायक नासिरभाई यांना येऊन मिठी मारून हबक्या नी हुबक्या रडले तो क्षणही सर्वांचे डोळे पाणावून गेला. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा पाटील, देवेंद्र पाटील युवराज पाटील , विद्याधर पाटील , कांचन थळी , सचिन आडमुठे , राजेंद्र ठाकूर , सुजित पाटील , श्यामकांत म्हात्रे , लक्ष्मीकांत म्हात्रे , सुरेश म्हात्रे , प्रदीप पाटील , दिनेश म्हात्रे , डी बी गावंड , विनोद म्हात्रे , राम गावंड, विनोद ठाकूर , विकीभाई म्हात्रे , अविनाश ठाकूर , कांचन म्हात्रे आदींनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page