कर्जत, गणेश पुरवंत
मिरवणुकीत सर्वपक्षीय मराठा नेत्यांची हजेरी
लाखो बंधावंसह मुंबई दिशेने मनोज जरांगे पाटील वाशी मध्ये असतानाच शासकीय शिष्टमंडळाकडून जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. आज सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन अध्यादेश मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्त करताच संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष करण्यात आला. कर्जत तालुक्यातील मराठा बांधव यांनी डीजे रथ सहित जरांगे पाटील यांच्या गाण्यावर ताल धरला होता. यावेळी मराठा समाजातील दिग्गज राजकीय नेत्यांनी सुद्धा समाजासोबत गुलाल उधळीत मिरवणुकीत सहभाग घेतला.
कर्जत तालुक्याच्या वतीने शहरातील छत्रपती शिवराय स्मारक डेक्कन जिमखाना, बाजारपेठ, टिळक चौक आंबेडकर स्मारक श्रीराम पुल ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक दहिवली असा मार्ग ठरला होता. या रॅली मध्ये कर्जत मधील मराठा मराठा समन्वयक सहित शेकडो मराठा बांधव सामील झाले होते. खोपोली येथील मराठा समन्वयक सुनिल पाटील यांसह आमदार महेंद्र थोरवे समाज बांधव म्हणून या रॅलीत सहभागी झाले होते. कर्जत मधील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत सुद्धा या मिरवणुकीत सामील झाले होते.
विजयी मिरवणूक पोलीस ग्राउंड परिसरात पोहचत असताना श्रीराम पुलावर एका आदिवासी तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याचे समजताच समन्वयक यांनी सामजिक भावना जपण्याच्या दृष्टीने डीजे रथ थांबवत शांतपणे संभाजी महाराज स्मारक दहिवली येथे मिरवणुकीचा समारोप केला.