उरण, प्रतिनिधी
उरण तालुक्याला निसर्गाचे वरदान आहे. तर या निसर्गामध्ये येथील नागाव समुद्र किनारा आणखी भर टाकत आहे. यामुळे येथे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच वाढत्या पर्यटकांची संख्या पहाता संधीसाधु भुरट्यांकडून छोटयामोठ्या चोऱ्या नित्याचेच झाले आहे. मात्र येथे पर्याटनासाठी आलेल्या तरुणांनी सापडलेले पाकिट मूळमालकास परत करून आपल्या इमानदारिचा नमुना सादर केला आहे. उरणमधील खोपटे येथील गिरीधर पाटील हे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आले असता, त्यांचे पाकिट हरवले होते. याचवेळी खारघर येथून पर्यटनासाठी आलेल्या आदित्य मोमोडिया व त्यांचे मित्र यांना हे पाकिट मिळाले. या पाकिटामध्ये पैसे, एटीएम कार्ड, पॅन कार्ड यासारखे महत्वाचे डॉक्युमेंट्स असल्याने, या तरुणांनी उरणमधील "ज्ञान कला क्रीडा मंडळ" अध्यक्ष अमित ठाकूर यांच्याशी संपर्क साधून ते पाकिट त्यांच्या स्वाधीन केले. यावेळी पर्यटनासाठी आलेल्या तरुणांच्या इमानाबाबत संस्थांचे महेश फराड यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.