उरण, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील केळ्याचामाळ आदिवासी वाडीतील तरुणाला अपघातामुळे आलेल्या अपंगत्वाने तब्बल दहा वर्षे घराच्या कुडांमध्ये अडकून बसावे लागले होते. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून या तरुणाला व्हीलचेअर भेट देऊन बाहेरचे जग दाखवण्याचे काम करण्यात आले आहे. यावेळी या तरुणांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पहायला मिळाले.
औद्योगिक दृष्ट्या देश मोठी झेप घेत आहे. मात्र आजही वाड्या, वस्त्यांवरील जीवन फारसे सुधारलेले नसल्याचे दिसून येत आहे. या वसत्यांवर विविध सामाजिक संस्था काम करत असल्याने काहीसा दिलासा येथील नागरिकांना मिळत असतो. अशाच प्रकारच्या उरण तालुक्यामधील चिरनेर विभागात असणाऱ्या वाड्या, वसत्यांवरील जीवन सुद्धारण्यासाठी "वनवासी कल्याण आश्रम" गेली अनेक वर्षे काम करीत आहे. येथील "केळ्याचा माळ" या वाडीमधील गणेश कातकरी या तरुणाला अपघातामधून कायम स्वरूपी अपंगत्व आल्याने, गेली दहा वर्षे हा तरुण आपल्या झोपडीच्या कुडामध्ये अडकून होता. याबाबत माहिती मिळताच त्याच्यासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी या तरुणाला बाहेरचे जग दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला. मनोज ठाकूर यांच्या प्रयत्नातून सामाजिक कार्यकर्ते सुशील दर्णे आणि कुटुंबा तर्फे त्यांच्या मातोश्री कै.मीना प्रभाकर दर्णे यांच्या स्मरणार्थ व्हील चेअर भेट देण्यात आली. कुडाच्या भिंतीमध्ये अडकून बसलेल्या या तरुणाला व्हीलचेअरमुळे आता मोकळ्या वातावरणात फिरता येणार आहे. त्यामुळे या तरुणाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पहायला मिळाले.
केळ्याचा माळ या वाडी जवळच असणाऱ्या चांदायली या कातकरी वाडीवरील १४ निराधार भगिनींना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप देखील करण्यात आले आहे. तर यावेळी आफिवासी बांधवांच्या रक्तामधील हिमोग्लोबिन तपासांनी देखील करण्यात आली. या शिबिरामध्ये ३० भगिनींनी तपासांनी केली आहे. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे अशांना हिमोग्लोबिन वाढीसाठी दोन महिने गोळ्या देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन केळ्याचा माळ येथील प्राथमिक शिक्षिका लहासे मॅडम, बालसंस्कार वर्ग संचालिका विजया कातकरी यांनी केले. तरकार्यक्रमासाठी सोहम दर्णे, सौ.स्वाती दर्णे, सुनीता दर्णे, राजश्री दर्णे, दिव्या दर्णे, शलाका ठाकूर, हर्षित ठाकूर तसेच वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्हा हितरक्षा प्रमुख मीरा पाटील, रोशन कातकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.