कर्जत, गणेश पुरवंत
कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या जामरुंग ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याचा वावर आढळून आला असतानाच आता बिबट्या कडून गाईच्या वासराची शिकार करण्यात आली असल्याची घटना समीर आली आहे. तर या घटनेने परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असलेला जामरूंग हा भाग भीमाशंकर अभयारण्य लगत आहे. त्यामुळे या भागात पशू, प्राणी यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत असतो. मागे रानगवा याचा तालुक्यात मुक्त संचार सुरू होता. तर बिबट्या, लांडगा, तरस या सारखे वन्य प्राणी मानवी वस्तीत शिकार करण्यासाठी येत असतात. असाच काहीसा प्रकार दिनांक ५ फेब्रुवारी रोजी रात्री घडला असल्याचे समोर आले आहे. जामरूंग ग्रामपंचायत हद्दीतील हिऱ्याची वाडी येथील बाळू ठोंबरे यांच्या मालकीचे गाय वासरू घराच्या मागे चरत असताना पाठीमागून येऊन बिबट्याने झडप घालून हल्ला केला. त्यामुळे वासरू जागीच ठार झाले. मात्र ठोंबरे यांनी जोरजोरात आवाज केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला. या घटनेची माहिती बाळू ठोंबरे यांनी वन अधिकारी विठ्ठल खांदेश्वर यांना कळवली असून या घटनेचा पंचनामा वनविभागाकडून करण्यात आला आहे. ठोंबरे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांना कडून करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.