कर्जत, गणेश पुरवंत
जैन साध्वी सह सेवेकरी हे नेरळच्या दिशेने पायी येत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती कि त्यात जैन साध्वीसह एका सेवेकरी महिलेचा मृत्यू झाला. तर अन्य एक महिला सेवेकरी गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कर्जत पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत त्या अज्ञात वाहनाला शोधून काढत वाहन ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास जैन साध्वी मौलिक पुराणश्रीजी व इतर सेवेकरी असे एकूण १२ लोक कर्जत वरून नेरळ कडे विहार करत पायी येत होते. त्याचवेळी नेरळ कडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये साध्वी मौलिक पुराणश्रीजी व लता संदीप ओसवाल यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दिपाली संजय ओसवाल या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. ३० तास मृत्यूवाशी झुंज देत असताना अखेर त्यांची आज प्राणज्योत मावळली या प्रकरणाने शांत व संयमी समजला जाणारा जैन समाज संतप्त झाला. तर या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाने कर्जत, नेरळ, खोपोली भागातील आपली दुकाने बंद ठेवली. तर याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे भा.द.वि कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिसांनी तात्काळ सदर अज्ञात वाहनाचा शोध सुरु केला होता. तसेच कर्जत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने टेम्पोचा शोध घेऊन त्याला तळोजा येथून चालकांसह ताब्यात घेतले असल्याचे समजते. हा अमूल दुधाचा टँकर असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रायगड पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जैन समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले.