कर्जत, गणेश पुरवंत

महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरू केला आहे. या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवला होता. रा.जि.प शाळा किरवली शाळेला भिसेगाव केंद्रातून पहिला, तर तालुक्यातून द्वितीय क्रमांक मिळवण्यात यश प्राप्त झाले. या स्पर्धेत शाळेला बक्षीसाचा २०००००/- (दोन लाख) रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

“माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत स्पर्धेत 45 दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम ऑनलाइन शाळेची नोंदणी करून शाळेबद्दल ची माहिती, शाळेतील उपक्रमांचे फोटो व उपक्रमाचे अहवाल ऑनलाइन अपलोड केल्यानंतर प्रत्यक्षात शाळा तपासणी केंद्रप्रमुख पथकाकडून करण्यात आली. तपासणी केल्यानंतर भिसेगाव केंद्रातून शाळेचा पहिला क्रमांक आला व तालुकास्तरावर निवड झाली. नंतर पुन्हा तालुका तपासणी केली. शाळेतील मंत्रिमंडळ, शाळेची परस बाग, स्वच्छता मॉनिटर, बचत बँक,अशा विविध बाबींची विद्यार्थ्यांकडून पथकाने माहिती घेतली. अशा तपासणीतून रा.जि.प. किरवली शाळेची तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी दौंड सर व केंद्राच्या केंद्रप्रमुख साळोखे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका प्रियंका हरवंदे, चित्रा पाटील, राजेंद्र रुपनवर, आकाराम पाटील, वैशाली पाटील यांच्यासह उपक्रमामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर बडेकर, उपाध्यक्ष विश्वनाथ बडेकर, पोलीस पाटील विवेक बडेकर, सुनंदा बडेकर (माजी बालकल्याण सभापती) तसेच सदस्य, सदस्या केंद्रातील शाळा व सर्व शिक्षक वृंद, किरवली गावातील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व पालक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.